JioFiber ला BSNL देणार टक्कर, सादर करणार ‘ट्रिपल प्ले प्लॅन’

1015

प्रकाशाच्या वेगाइतका इंटरनेट स्पीड देणारी ‘जिओ गिगा फायबर’ सेवा लॉन्च झाल्यानंतर अनेक ब्रॉडबँड सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्या त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेत आहेत. याच शर्यतीत आता सरकारी कंपनी ‘बीएसएनएल’ने ही उडी घेतली आहे. जिओ फायबर प्रमाणेच, बीएसएनएलने देखील ‘ट्रिपल प्ले प्लॅन’ (एका बिलात तीन सेवा, लँडलाइन, ब्रॉडबँड आणि लाईव्ह टीव्ही) सुरू करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी यासाठी केबल टीव्ही ऑपरेटरशी बोलणी करीत आहे.

जिओ फायबर आपल्या प्लॅनमध्ये लँडलाइन, ब्रॉडबँड आणि लाईव्ह टीव्ही या तीन सेवा पुरवतो. तर बीएसएनएल आपल्या ग्राहकांना ब्रॉडबँड प्लॅनमध्ये ब्रॉडबँड आणि लँडलाइन या सेवा पुरवतो. केबल टीव्ही ऑपरेटरशी पार्टनरशिप झाल्यानंतर बीएसएनएलही जिओ फायबर प्रमाणे ट्रिपल प्ले प्लॅनची सेवा देऊ शकणार आहे. तसेच बीएसएनएल केबल ऑपरेटर्सना एक बॉक्स देखील पुरवणार आहे, ज्यात जिओ फायबर प्रमाणे तिन्ही सेवांसाठी कनेक्टिव्हिटी असणार आहे.

जिओ फायबरचा प्रारंभिक प्लॅन हा 699 रुपये आहे. ज्यात  ग्राहकांना लँडलाईन, ब्रॉडबँड आणि केबल टीव्ही सेवा मिळेल. दुसरीकडे, बीएसएनएलच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना लँडलाईन आणि ब्रॉडबँड सेवा मिळते. जिओ फायबरच्या सेट टॉप बॉक्ससह ग्राहकांना स्थानिक केबल टीव्ही ऑपरेटरकडून स्वतंत्र कनेक्शन घ्यावे लागते. त्यानंतरच ग्राहकांना लाईव्ह टीव्ही पाहता येतो. यासाठी ग्राहकांना केबल ऑपरेटरला स्वतंत्रपणे पैसेही द्यावे लागत. मात्र बीएसएनएल आपल्या ग्राहकांना तिन्ही सुविधा एकाच किंमतीवर देईल, म्हणजेच बीएसएनएलचा ट्रिपल प्ले प्लॅन घेतल्यानंतर केबल ऑपरेटरला स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागणार नाहीत.

700 रुपयांपासून सुरू होणार बीएसएनएलचा ‘ट्रिपल प्ले प्लॅन’ 

एकाच किंमतीत तीन सेवा देणारा बीएसएनएलचा ‘ट्रिपल प्ले प्लॅन’ 700 रुपयांच्या सुरुवाती किंमतीवर सुरु होऊ शकतो. ही सेवा नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू होऊ शकते. सुरुवातीला ही सेवा काही निवडक शहरांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. नंतर या सेवेला देशभरात लॉन्च करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या