
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचे असते असे म्हटले जाते. उत्तर प्रदेशमध्ये याचीच प्रचिती एका उमेदवारला आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये अवघ्या 181 मतांनी एका उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्रिभुवन राम असे या उमेदवाराचे नाव ते बसपच्या तिकीटावर उभे होते.
उत्तर प्रदेशच्या मच्छलीशहर मतदारसंघातून भाजपचे बीपी सरोज उर्फ भोलानाथ उभे होते. त्यांच्या विरोधात बसपचे त्रिभुवन राम उभे होते. भाजपचे बीपी सरोज यांना 4लाख 88 हजार 397 मते मिळाली तर बसपच्या त्रिभुवन राम यांना 4 लाख 88 हजार 216 मते मिळाली. म्हणजेच भोलानाथ यांनी त्रिभुवन राम यांचा अवघ्या 181 मतांनी पराभव केला. टक्केवारीत हे मताधिक्क्य अवघे 0.20 टक्के इतके आहे.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहम्मद फैजल हे रडतखडत पुन्हा विजय मिळवला आहे. अवघ्या 823 मतांनी त्यांचा विजय झाला आहे. फैजल यांच्या विरोधात काँग्रेसचे हमदुल्ला सईद उभे होते. फैजल यांना 22 हजार 851 मते मिळाली तर सईद यांना 22 हजार 28 मते मिळाली आहेत.
त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या अपरुपा पोद्दार यांचा अवघ्या 1 हजार 142 मतांनी विजय झाला आहे. तर अंदमान निकोबारमधील काँग्रेस उमेदवार कुलदीप शर्मा यांचा 1 हजार 407 आणि झारखंडमध्ये खुंटी मतदारसंघातून भाजप उमेदवार अर्जून मुंडा यांचा 1 हजार 445 मतांनी विजय झाला आहे.























































