मायावती यांनी खेळले ‘ब्राह्मण कार्ड’, सत्तेत आल्यावर भगवान परशुरामाची भव्य मूर्ती उभारणार

2703

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी कोरोना काळात रूग्णांची हेळसांड सुरू असल्याचा आरोप योगी सरकारवर केला आहे. राज्यात पुन्हा बसपा सरकार आल्यास रुग्णालयांचे निर्माण करण्यात येईल, वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या जातील आणि लोकांना थांबण्यासाठी व्यवस्थाही केली जाईल असे आश्वासन दिले. तसेच ब्राह्मण मतांवर डोळा ठेऊन सत्तेत आल्यावर भगवान परशुरामाची भव्य मूर्ती उभारणार अशी घोषणा देखील केली.

यावेळी मायावती यांनी समाजवादी पक्षावर निशाणा साधला. समाजवादी पक्षाला जर भगवान परशुराम यांचा पुतळा उभारायचा असता तर त्यांनी त्यांच्या कार्यकाळात उभारला असता. मात्र बसपा सपा सारखे करणार नाही, तर आम्ही जे बोलतो तेच करूनही दाखवतो, असेही मायावती म्हणाल्या.

राज्यात चार वेळा सत्तेत आलेल्या बसपा सरकारने सर्व जाती, धर्माच्या महान संतांच्या नावावर अनेक योजना सुरू केल्या होत्या, जिल्ह्याला त्यांची नावे दिली होती, मात्र सपा सरकारने जातीयवादी मानसिकतेतून आणि द्वेष भावनेतून या योजना, नावं बदलली. बसपा सरकार सत्तेत आल्यावर पुन्हा पूर्वीसारखं करण्यात येईल असेही मायावती यावेळी म्हणाल्या.

भाजप सरकारवर साधला निशाणा
पाच ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपूजन झाले. मात्र या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दलितांचे प्रतिनिधी म्हणून बोलावणे आवश्यक होते. तसेच काही दलित संत देखील आम्हाला निमंत्रण नाही म्हणून ओरडत होते, त्यामुळे त्यांना, राष्ट्रपती यांना बोलावले असते तर चांगले झाले असते, असे म्हणत मायावती यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.

आपली प्रतिक्रिया द्या