
>> वर्षा चोपडे
बुद्धाच्या जन्माच्या कथा जातक कथा म्हणून प्रसिद्ध आहेत. या जातक कथा स्तूपांच्या रेलिंग आणि तोरणांवर चित्रित केल्या गेल्या होत्या. बुद्धांचे महान गुण दर्शवत बौद्ध धर्माचे नैतिक धडे शिकवणाऱया या कथा जातक म्हणून नोंदवल्या गेल्या, ज्या समाजात आजही लागू पडतात. विविध भारतीय बौद्ध शाळांमध्ये जातकांचे वेगवेगळे संग्रह असून यातील सर्वात मोठा ज्ञात संग्रह म्हणजे थेरवाद शाळेतील जातकत्थवन्न!
बुद्ध म्हणजे ‘जागृत व्यक्ती’. बुद्ध धर्म आणि बौद्ध धर्म अर्थात ‘ज्ञानी व्यक्तीचा सिद्धांत’ आणि ‘बौद्धांचा सिद्धांत’ असा त्याचा अर्थ आहे. सुरुवातीच्या ग्रंथांमध्ये बुद्धांच्या कुटुंबाचे नाव ‘गौतम’ (पालीः गौतम) असे आहे, तर काही ग्रंथांमध्ये ‘सिद्धार्थ’ हे आडनाव आहे. भगवान बुद्धांचा जन्म सध्याच्या नेपाळमधील लुंबिनी येथे झाला आणि ते कपिलवस्तू येथे वाढले. वर्षानुवर्षे कठोर ध्यान केल्यानंतर त्यांना बोधगया (बिहार) येथील बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली आणि ते सिद्धार्थ गौतमपासून भगवान बुद्ध झाले. भगवान बुद्ध करुणामयी होते. त्यांनी कधीच चमत्कार करून आपल्या शिष्यांना किंवा लोकांना भुलवले नाही. बुद्धाच्या जन्माच्या कथा जातक कथा म्हणून प्रसिद्ध आहेत. जातक कथा म्हणजे जन्मासंबंधित किंवा जन्मकथा प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मानवी आणि प्राण्यांच्या दोन्ही स्वरूपात मागील जन्मांशी संबंधित आहे. या जातक कथा स्तूपांच्या रेलिंग आणि तोरणांवर चित्रित केल्या गेल्या होत्या. बुद्धांचे महान गुण किंवा परिपूर्णता, जसे की, उदारतादेखील दर्शवतात आणि बौद्ध धर्माचे नैतिक धडे शिकवतात. या जातक कथा बनारसभोवती फिरतात, जे भारतातील सध्याचे वाराणसी आहे.
शेवटच्या दहा कथा एकूण 547 जातक कथांपैकी सर्वात प्रसिद्ध आहेत. या कथा मानवजातीच्या 10 गुणांचे वर्णन करतात, जे ज्ञानप्राप्ती संबंधित गुण आहेत. त्याग, सर्वसंगपरित्याग, परोपकार, पूर्ण दृढनिश्चय, अंतर्दृष्टी, नैतिकता, संयम, समता, वास्तव आणि उदारता. कथांच्या प्रस्तावनेतील पाली जातक निदानात आढळणाऱया पारंपरिक दृष्टिकोनानुसार, गौतमांनी भविष्यात बुद्ध दिपंकरांच्या आधी बुद्ध होण्याचे व्रत घेतले. त्यानंतर त्यांनी बुद्धत्वाच्या मार्गावर अनेक जन्म घालवले आणि या जीवनातील कथा जातक म्हणून नोंदवल्या जातात. जातक कथा समाजात आजही लागू पडतात. विविध भारतीय बौद्ध शाळांमध्ये जातकांचे वेगवेगळे संग्रह होते. सर्वात मोठा ज्ञात संग्रह म्हणजे थेरवाद शाळेतील जातकत्थवन्न! या कथा 300 ईसापूर्व आणि 400 ईसापूर्व दरम्यानच्या आहेत. जातक कालांतराने शास्त्रीय संस्कृतमध्ये रचले जाऊ लागले. कदाचित सर्वात प्रभावशाली आणि महत्त्वाचा संस्कृत जातक ग्रंथ म्हणजे आर्यशूराचा ‘जातकमाला’ अर्थात जातकांचा हार, ज्यामध्ये 34 जातक कथांचा समावेश आहे. तिबेटी बौद्ध धर्मात जातकांनादेखील महत्त्व आहे. अनेक भाषेत जातक कथांचे भाषांतर झाले. जातकत्थवन्नन या थेरवाद जातक गद्यसंग्रहा 547 जातक आहेत आणि ते सुमारे 500 च्या सुमारास संग्रहित केले गेले. त्याआधी निदान जातक कथा आहे, जे बुद्धांचे चरित्र असून त्यांच्या जीवनाशी संबंधित कथा सांगते. हा जातकांचा सर्वात मोठा संग्रह आहे.
एक जातक कथा वाचनात आली. एक हंस आपल्या भावासोबत विविध ठिकाणी चारा शोधण्यास जात असे. ते एकदा एका पर्वतावर गेले, त्या पर्वताचा असा गुण होता की, जो त्या पर्वतावर जाई त्याची कांती सोनेरी होत असे. जेव्हा हे दोन्ही हंस तेथे गेले तेव्हा त्यांची कांतीही सोनेरी झाली आणि अलौकिक तेजाने ते चमकू लागले. इतरही अनेक पक्षी त्यात होते. तेही चमकत होते. त्यात काही हिंसक, क्रूर, कपटी, नीच प्राणी, जसे कोल्हा, वटवाघूळ, कावळे, सिंह, वाघही होते. तेसुद्धा चमकत होते म्हणजे तात्पुरती का होईना, पर्वतावर जो जाईल त्याला सोनेरी झळाळी प्राप्त होत असे. यावर हंस आपल्या भावाला म्हणाला, “दादा, येथे सगळ्यांना सोनेरी रूप मिळाले. यात क्रूरकर्मी आणि इतरांना फसवणारे, लुबाडणारे, जीव घेणारे प्राणीही आहेत. असे का?” यावर मोठा हंस म्हणाला, “बाबा रे, या पर्वतावर जो कोणी येईल त्याला सोनेरी रूप मिळते ही या पर्वताची थोरवी आहे.”
यावर रागवून छोटा हंस म्हणाला, “दादा, हे योग्य नाही. हा पर्वत मला आवडला नाही. कावळे, कोल्हे, सिंह, वाघ आणि इतर दुष्ट प्राण्यांना इतका आदर का? सज्जन आणि दुर्जनांना समान वागणूक देणारा पर्वत नक्कीच योग्य नाही. येथे राहणे मला योग्य वाटत नाही येथून निघून गेलेले बरे.” यावर मोठा हंस म्हणाला, “ज्या ठिकाणी दुर्गुणी हुजऱयाचा आणि सज्जनाचा सारखा मान असतो, त्या ठिकाणी शहाण्या व्यक्तीने थांबू नये असे सुभाषित आहे. तेव्हा हा पर्वत जरी पर्वतांचा राजा असला तरी येथे थांबणे धोकादायक आहे. या पर्वताची योग्यता मोठी असली तरी सर्व प्राण्यांना सोन्याचे बनवणे हा याचा अवगुण म्हणता येईल.” असे बोलून दोन्ही हंस तेथून निघून गेले.
या गोष्टीचे तात्पर्य असे आहे की, सज्जनाला मान मिळत असला तरी सामाजिक जीवनात चांगले-वाईट समजत असून लायकी नसलेल्या, दुर्जनांना चांगली वागणूक देणारे अनेक जण आहेत. थोडा स्वार्थ दिसत असला की, तुच्छ विचारांच्या दुर्जन व्यक्तीला अवास्तव महत्त्व दिले जाते आणि मान देण्याच्या लायकीचा नसला तरी त्याला मान दिला जातो. त्यामुळे सामाजिक हिंसा वाढत असून सामाजिक मूल्यांची घसरण होत आहे. अशा सैतानी प्रवृत्तीला ठेचणे गरजेचे आहे. समाजाला सुरक्षित वातावरण मिळणे गरजेचे आहे. बुद्धाने शांतीचा संदेश दिला तरी ही कथा योग्य व्यक्तीची बाजू घ्या आणि त्यालाच सन्मान द्या हा संदेश देते.
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)