
लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला मंत्रीच सभागृहात उपस्थित नसल्यामुळे सत्ताधारी भाजपचे सदस्य हरीश पिंपळे आज कमालीचे संतप्त झाले. कोल्हापूरमधील एका लक्षवेधी सूचनेवर सरकारचे उत्तर आले नाही. संबंधित कॅबिनेट मंत्री सभागृहात उपस्थित नाहीत. राज्यमंत्री तरी असले पाहिजेत. किती गांभीर्याने आपण सभागृह चालवत आहात? ही काय पद्धत आहे का असा संतप्त सवाल हरीश पिंपळे यांनी केला.
जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांनी कोल्हापूर जिह्यातील शाहूवाडीतील माध्यमिक शाळेच्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यावरील चर्चेला सभागृहात मंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळे ही लक्षवेधी सूचना पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. त्यावर भाजपचे आमदार हरीश पिंपळे संतप्त झाले. लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली पाहिजे अशी सर्व सदस्यांनी आजच मागणी केली आहे. आता विनय कोरे यांच्या लक्षवेधीचे उत्तर आले नाही. संबंधित पॅबिनेट मंत्री सभागृहात उपस्थित नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यावर मंत्री विधान परिषदेत आहेत त्यांना येण्यासाठी उशीर होत आहे असे उत्तर मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले. त्यामुळे हरीश पिंपळे अधिकच संतप्त झाले. या सभागृहातील 288 सदस्य लोकांमधून निवडून येतात. विधान परिषदेचा दाखला देऊन खालच्या सभागृहाचा अवमान करणे हे योग्य नाही. विधानसभा अध्यक्षांनी मंत्र्यांना समज द्यावी नाहीतर मंत्री येईपर्यंत पाच मिनिटे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्याची मागणी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनीही मंत्री येईपर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित करा, अशी मागणी केली.
लक्षवेधी वाढवण्याची मागणी
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजात लक्षवेधीची संख्या कमी असण्यावरून आमदारांची ही नाराजी विधानसभेच्या कामकाजात दिसून आली. भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी लक्षवेधी कमी केल्यामुळे मतदारसंघातील प्रश्न मांडता येत नाही हे अन्यायकारक असून विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी विशेषाधिकार वापरून या लक्षवेधींची संख्या वाढविण्याची मागणी केली. दरम्यान, लक्षवेधींची संख्या वाढण्याच्या संदर्भात सर्व सदस्यांच्या भावनांचा विचार करून याबाबत लवकरच गटनेत्यांसोबत चर्चा केली जाईल. तीनपेक्षा जास्त लक्षवेधी घेण्याचा नियम नसला तरी याबाबत विशेषाधिकार वापरण्यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.

























































