ठाण्यातील बिल्डरांनी म्हाडाला लावला 200 कोटींना चुना; बनावट गहाणखत बनवून 213 गुंठे जमीन ठेवली गहाण

क्लस्टर अंतर्गत पुनर्विकास करण्याच्या नावाखाली ‘मे. पियर्स रियल्टी प्रा.लि.’ या बिल्डरने महाराष्ट्र नगरमधील 348 कुटुंबांची घोर फसवणूक केली आहे. करार केल्यानंतर सात वर्षे उलटली तरी अद्यापि बांधकाम लटकवले आहे. एवढेच नव्हे तर, परवानगी नसतानाही म्हाडाची तब्बल 213 गुंठे जमीन एका फायनान्स कंपनीकडे परस्पर गहाण ठेवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बिल्डरने बनावट गहाणखत बनवून 200 कोटी रुपयांचे कर्ज लाटले असून म्हाडा प्रशासनाला सपशेल चुना लावला आहे. ठाणे न्यायालयाने दणका दिल्यानंतर ‘पियर्स रियल्टी’च्या संचालकांसह 13 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

काशिनाथ घाणेकर नाटय़गृहाच्या मागील बाजूस असलेल्या महाराष्ट्र नगरमध्ये म्हाडाची 19 इमारतींची मोठी वसाहत आहे. त्यातील 18 इमारती धोकादायक झाल्याने त्याचा पुनर्विकास करण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला. त्यासाठी ‘मेसर्स पियर्स रियल्टी प्रा.लि.’ या विकास पंपनीची नियुक्ती केली. 27 सप्टेंबर 2017 रोजी रीतसर करारदेखील केला. पण बिल्डरने आस्ते कदम कारभार केला असून जमिनीची मालकी असलेल्या म्हाडाचीच फसवणूक केली. ही पंपनी 22 मजल्यांचे 5 टॉवर बांधणार होती. पण खोटी कागदपत्रे तयार करून 200 कोटींचे कर्ज घेतल्याचे आढळून आले.

रहिवाशांचा लढा

या फसवणुकीविरुद्ध स्थानिक रहिवाशी अरुण तायडे यांनी लढा दिला. त्यांनी यासंदर्भात दोन वर्षांपूर्वी चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन दोषींवर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. पण पोलिसांनी दाद दिली नाही. अखेर त्यांनी ठाणे न्यायालयात धाव घेतली. सर्व पुरावे व गांभीर्य लक्षात घेऊन न्यायमूर्ती बी.एस. पाल यांनी तत्काळ संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. अॅड. निखिल वाघ व अॅड. अभिनव तायडे यांनी भक्कमपणे न्यायालयात बाजू मांडली.

अशी केली चारसोबीसगिरी

पियर्स कंपनीला फक्त 18 इमारतींच्या पुनर्विकासाचे अधिकार दिले होते. त्यातील गट क्रमांक 55/6 व गट क्र. 56/6 ही जमीन म्हाडाची असून ती लीजवर दिली आहे. तरीदेखील कंपनीच्या संचालकांनी बनावट गहाणखत बनवून ते ‘मे. विस्तारा आयटीसीएल’ या कंपनीला सादर केले. ठाण्याच्या सहदुय्यम निबंधकांकडे पियर्स कंपनी व विस्तरा आयटीसीएल या दोन कंपन्यांनी 28 जून 2018 रोजी मॉरगेज डीडदेखील केले. बनावट कागदपत्रे असूनही विस्तरा कंपनीने 200 कोटींचे कर्ज मंजूर केले. या खोटारडेपणाचा बुरखा अखेर फाटला आहे.

यांच्यावर गुन्हे दाखल

भास्कर कामत, सचिन हिराप, पुष्कर आपटे, विकास जोशी, विवेक जाधव, प्रकाश जोशी (पियर्स पंपनीचे संचालक), श्रीकांत परांजपे, शशांक परांजपे (परांजपे स्कीमचे संचालक), दीप्ती जैन, राजेंद्र कश्यप, गोपालकृष्णन बालकृष्ण, देब्रता सरकार (विस्तरा कंपनीचे संचालक), संजय कांबळी (सप्तश्री गृहनिर्माण संस्था संचालक).