घाटकोपरमधील एका इमारतीला आग लागल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या रहिवाशांची सुटका केली. या इमारतीमधून 80 हून अधिक जणांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले आहे. तर धुरामुळे 13 जणांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकर नगरमधील शांतीसागर इमारतीला शुक्रवारी मध्यरात्री आग लागली. इमारतीच्या मीटर केबिनमधील वायरिंग जळाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीमुळे इमारतीसह परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. जवानांनाही धुरामुळे बचावकार्य करण्यात अडथळे येत होते. अग्निशमन दलातील जवानांनी इमारतीच्या विविध मजल्यावर अडकलेल्यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले.
शिवसेना मदतीला धावली
शांतीसागर सोसायटीमध्ये लागलेल्या भीषण आगीची माहिती मिळताच शिवसेना रहिवाशांच्या मदतीसाठी धावली. रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी शिव आरोग्य सेनेचे डॉ. किशोर ठाणेकर, उपाध्यक्ष डॉ. जयवंत गाडे, महाराष्ट्र समन्वयक जितेंद्र सकपाळ यांच्या सूचनेनुसार मुंबई सह समन्वयक प्रकाश वाणी, विधानसभा संघटक सचिन भांगे, पैलास गोसावी, चंद्रकांत हळदणकर, गोपाळ जोशी यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींना योग्य ते उपचार देण्यात यावे, अशी विनंती डॉक्टरांना केली. रुग्णांच्या नातेवाईकांना भेटून सर्वतोपरी मदत देण्यात येईल असे आश्वासन दिले.