बुलढाणा – टाळ-मृदंगाच्या गजरात निघाली नवरदेवाची वरात

अलिकडच्या काळात लग्न म्हटलं की लाखो रूपयांचे बॅन्ड, डी.जे. वाजवण्याची क्रेज वाढत असतांना त्याला अपवाद ठरावा असा लग्न सोहळा मोताळा तालुक्यात आव्हा येथे पार पडला. डी.जे. नाही, बॅन्ड नाही, तर चक्क वारकरी संप्रदायाचा वारसा जपत टाळ मृदंगाच्या गजरात, शिवकिर्तनात फुगळीच्या मनमोहक आनंदात, जेष्ठ नागरिकांच्या भक्तीमय वातावरणात नवरदेवाची वरात काढण्यात आली. ही बाब सामाजात एक आदर्श निर्माण करणारी ठरत आहे. असा आगळावेगळा लग्न सोहळा सोमवारी 29 मे रोजी मोताळा तालुक्यातील आव्हा येथे पार पडला.

मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील जगन्नाथ केशव संबारे यांचा मुलगा गणेश व मोताळा तालुक्यातील आव्हा येथील ओंकार मधुकर घोंगटे यांची मुलगी निकिता यांचा विवाह सोहळा आव्हा येथे पार पडला. या विवाह सोहळ्याआधी नवरदेवाची टाळ मृदंगाच्या तालात वरात काढण्यात आली. संपूर्ण गावातून वरात फिरुन आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पुजन करुन पुष्पहार वर आणि वधु कडुन अर्पन करण्यात आले. नंतर हरी भक्त पारायण महाराजांच्या उपस्थित लग्न सोहळा पार पडला.

नवरदेवाचे होत आहे कौतुक

हल्लीच्या काळातील मुलांना स्वतःच्या लग्नाची आगळी वेगळी आशा असतांना कुठलाही व्यर्थ खर्च न करता पुरोगामी विचारांची चर्चाच न करता प्रत्यक्षात टाळ मृदंगाच्या नांदगजरात स्वतः चा विवाह पार पाडला. याची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा आहे.

– टाळ-मृदंग वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी, गायणाचार्य, मृदंगाचार्य आणि वयोरुद्ध लोकांच्या फुगळ्या महिलांच्या टाळ्यांच्या गजरात, परमेश्वराच्या नामचिंतनात, निघालेली नवरदेवाची वरात या लग्न सोहळ्याचे वैशिष्ठ्य ठरली आहे.