मिरची स्प्रे डोळ्यात मारून बँकेच्या कर्मचाऱ्यांना लुटले, आरोपी सीसीटीव्हीत कैद

जालनात नवीन मोंढा परिसरात चार संशयितांनी बुलढाणा अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची स्प्रे फवारुन व मारहाण करुन तीन लाख रुपये लुटल्याचा प्रकार सोमवार घडला आहे. या हल्ल्यात दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बुलढाणा अर्बन बँकेच्या नवीन मोेढा परिसरात असलेल्या शाखेत सोमवारी सकाळी बँकेचे कर्मचारी गणेश प्रल्हाद काकणे, अरविंद नागोराव देशमुख हे शहरातील शाखेतून तीन लाख रुपये घेऊन निघाले होते. पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास नवीन मोंढाच्या गेट क्रमांक २ जवळ चार जण दोन दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधून आले. त्यांनी बँकेचे कर्मचाऱ्यांची दुचाकी अडविली व त्यांना जबर मारहाण करुन त्यांच्याकडील तीन लाख रुपये लुटून पसार झाले. घटनास्थळावर फावडे अणि टिकास यांचे दांडे व एक स्प्रे आढळून आला आहे. हे साहित्य पोलीसांनी जप्त केले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, चंदनझिरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान लुटमार करणाऱ्या दोन दुचाकी पैकी एक दुचाकी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या