सामना प्रभाव – शिवस्मारकाशेजारील बेकायदा लॉजवर बुलडोझर; महापालिकेची कारवाई, इमारत जमीनदोस्त

मीरा रोडमधील काशिमीरा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मारकाशेजारीच उभारलेल्या बेकायदा लॉजवर आज अखेर बुलडोझर फिरवण्यात आला. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने ही धडक कारवाई करून लॉज भुईसपाट केला. दरम्यान बेकायदा बांधकाम करणाऱ्या माफियाविरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच याप्रकरणी अधिकाऱ्यांची बदनामी करणाऱ्यांविरुद्धदेखील पोलीस ठाण्यात तक्रार केली जाणार आहे.

मीरा रोडला शिवस्मारकाशेजारी बेकायदा लॉज होताच शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. या बातमीची गंभीर दखल पालिका प्रशासनाने घेतली असून आज सकाळी अतिक्रमणविरोधी पथक पोलीस बंदोबस्तात धडकले. पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या आदेशानुसार बेकायदा लॉजवर बुलडोझर फिरवण्यात आला. विशेष म्हणजे यापूर्वर्वीदेखील याच लॉजवर दोन वेळा कारवाई करण्यात आली होती. तोडलेले बांधकाम पुन्हा उभे राहिलेच कसे, असा थेट सवाल मराठी एकीकरण समितीने केला होता.

शिवस्मारकाच्या परिसरात कोणतेही अवैध धंदे होऊ नयेत याची काळजी महापालिकेने घेणे आवश्यक होते. तसेच तेथे चबुतरा बांधून पवित्र वास्तूचे सुशोभीकरण करावे, अशी मागणीदेखील मराठी एकीकरण समितीसह सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती. आज महापालिकेने तिसऱ्यांदा लॉजिंगवर हातोडा टाकला. मात्र यापुढे पुन्हा हे बांधकाम उभे राहिले तर मोठे आंदोल न उभारण्यात येईल, असा इशारा शिवप्रेमींनी दिला आहे.

पावित्र्य जपणार
आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, उपायुक्त कल्पिता पिंपळे, अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदा लॉजवर कारवाई करण्यात आली. यावेळी मोठा पोलीस फौजफाटादेखील तैनात केला होता. जेसीबी, पोकलेनच्या सहाय्याने लॉज जमीनदोस्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पावित्र्य जपण्यात येईल आणि परिसरात बेकायदा काही घडले तर त्यावर त्वरित कारवाईचा बडगा उगारू, असा इशारा उपायुक्त पिंपळे यांनी दिला आहे.