लखनऊ-आगरा एक्सप्रेसवे वर चालत्या बसमध्ये तरुणीची छेडछाड केल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या वेळी प्रवासादरम्यान सीटवर झोपत असताना सहाय्यक चालकाने तरुणीशी अश्लील चाळे केले. यानंतर तरुणी ओरडल्याने इतर प्रवाशी जागे झाले. मात्र बसमध्ये एवढा आरडाओरडा सुरू असूनही चालकाने बस थांबवली नाही.
तरुणीने 112 क्रमांकावर कॉल करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ अॅक्शन घेत कन्नौज-सौरिख परिसरात भरधाव बस रोखली आणि चालकाला अटक केली. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
बिहारमधील वैशाली ट्रॅव्हल्सची स्लीपर बस मंगळवारी नोएडाहून लखनऊ मार्गे पटना येथे प्रवासी घेऊन चालली होती. या बसमध्ये नोएडात राहत असलेली 22 वर्षीय तरुणीही प्रवास करत होती. मूळची लखनऊ येथील रहिवासी असलेली तरुणी नोकरीनिमित्त नोएडात राहते.
मध्यरात्री 3 च्या सुमारास बसचा सहाय्यक चालक रिजवान हा तरुणीच्या सीटजवळ आला आणि छेडछाड करू लागला. तरुणीने विरोध करूनही तो थांबला नाही. यामुळे तरुणीने आरडाओरडा केला. यामुळे अन्य प्रवाशी जागे झाले आणि बसमध्ये एकच कल्लोळ माजला.
मात्र चालकाने बस थांबवली नाही. यामुळे तरुणीने 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी जीपीएसद्वारे बसचे लोकेशन ट्रॅक करत चालकाला अटक केली.