
कर्जत आगारातील एसटी बसचा आज पनवेल येथे भीषण अपघात झाला. पनवेलहून कर्जतला बस निघाली असता ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट समोरच्या हायवा ट्रकला धडकली. या अपघातात विद्यार्थ्यांसह १५ प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कर्जत आगारातील बस पनवेल हून कर्जतच्या दिशेने येत असताना पनवेल कोन मार्गावर अचानक ब्रेक फेल झाल्याने बस समोर उभ्या असलेल्या डंपरला धडकली. अपघातात सत्यम श्रीखंडे, चैतन्य लोभी यांच्यासह १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुर्घटनाग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान कर्जत आगारातील नियोजन आणि देखभाल व्यवस्थेत त्रुटी राहिल्यामुळे अपघात झाल्याचा संताप प्रवाशांनी व्यक्त केला. प्रवासी आणि विद्यार्थी यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल प्रवासी साईनाथ श्रीखंडे यांनी व्यक्त केला.