प्रभावी क्वारंटाइन, परिणामकारक निर्जंतुकीकरणामुळे भायखळा, माटुंगामधील ‘डेली ग्रोथ’ सर्वात कमी

962
corona virus

प्रभावी क्वारंटाइन, परिणामकारक निर्जंतुकीकरण, दर्जेदार औषधोपचार आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी मल्टीव्हिटॅमिनसह सहायक उपचार केले जात असल्यामुळे काही दिवसांपूर्वी कोरोना ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या पालिकेच्या ई वॉर्ड म्हणजेच भायखळा परिसर आणि एफ – उत्तर म्हणजेच माटुंगा, शीव, वडाळा, किंग सर्कल, अँटॉपहिल परिसरात दैनंदिन रुग्णवाढ मुंबईत सर्वात कमी नोंदवली जात आहे. मुंबईचा डेली ग्रोथ रेट ३.५ असताना भायखळा परिसरात डेली ग्रोथ १.६ तर माटुंगा-शीव-वडाळा परिसरात १.९ इतकी दैनंदिन वाढ नोंदवली जात आहे.

पालिकेच्या ई वॉर्डमध्ये भायखळा, आग्रीपाडा, नागपाडा अशा दाटीवाटीच्या लोकवस्तीचा परिसर येतो. त्यामुळे या भागात क्लोज काँटॅक्ट वाढत गेल्याने सुरुवातीच्या काळात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. मात्र पालिकेच्या माध्यमातून हायरिस्क कॉटँक्ट शोधून प्रभावी क्वारेंटाइन केल्यामुळेच आता दैनंदिन रुग्णवाढ मुंबईतील सर्वात कमी म्हणजेच १.६ टक्केपर्यंत खाली आल्याचे सहायक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी सांगितले. भायखळा विभागात ९९ इमारती आणि २२ कंटेनमेंट झोन आहेत. दहा शाळांमध्ये क्वारेंटाइनची व्यवस्था करण्यात आली असून लक्षणे नसलेल्या संशयितांना ठेवण्यासाठी दोन हजारपर्यंत क्षमता आहे. या ठिकाणी सध्या पंधराशे लोक क्वारेंटाइन आहेत. ई वॉर्डमध्ये आतापर्यंत २८११ कोरोनाबाधित आढळले असले तरी यातील १२७५ जण कोनोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. तर आता १४५० अ‍ॅक्टिव्ह केसेस असून यातील सुमारे ८० टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नसून त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहितीही मकरंद दगडखैर यांनी दिली.

‘एफ-उत्तर’चा डबलिंग रेट ३२ दिवसांवर
– संमिश्र स्वरूपाची लोकवस्ती असलेल्या एफ-उत्तर विभागातील माटुंगा, शीव, वडाळा, अँटॉप हिल परिसरातही आता रुग्णसंख्या कमी होत आहे. प्रत्येक कोरोनाबाधितामागे किमान १५ जणांना क्वारेंटाइन करणे आणि आवश्यक खबरदारी घेतली जात असल्यामुळेच दैनंदिन ग्रोथ १.९ पर्यंत खाली आला असल्याचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळ यांनी सांगितले. एफ-उत्तर विभागातील लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठीच्या कोरोना केअर सेंटरमध्ये १२५० संशयित क्वारेंटाइन आहेत तर सीसीसी-२ मध्ये ४०० रुग्ण आहेत.
– विशेष म्हणजे एफ उत्तरमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता ३२ दिवसांवर गेल्याचेही बेल्लाळ म्हणाले. एफ-उत्तर विभागात २२३९ एकूण रुग्णसंख्या झाली असली तरी आतापर्यंत तब्बल १००८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर १०९५ अ‍ॅक्टिव्ह केसमधील ८० टक्केमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे बेल्लाळ म्हणाले. वॉर्डमध्ये १८३ इमारती आणि २२ कंटेनमेंट झोन आहेत. तर आतापर्यंत १३६ जणांचा मृत्यू झाला आहे.

भायखळ्यात एक हजार क्षमतेचे कोरोना हेल्थ सेंटर
भायखळ्यात रिचर्डसन क्रुड्स या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून एक हजार बेडच्या क्षमतेचे कोरोना हेल्थ सेंटर उभारण्यात येत आहे. या ठिकाणी ३०० बेड ऑक्सिजनची सुविधा असणारे राहतील अशी माहिती ई वॉर्डचे सहायक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी दिली. या कोरोना हेल्थ सेंटरचे ८० काम पूर्ण झाले असून १५ जूनपासून कार्यरत होईल असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या