यवतमाळचा वाघ बुलढाण्यातील अभयारण्यात, 5 महिन्यात 1300 किलोमीटरचा प्रवास

1522

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्‍वर अभयारण्यातील ‘सी 1’ या वाघाने 1,300 किलोमीटरचा संचार करून बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यापर्यंत मजल मारली आहे. या वाघाने पाच महिन्यांत हे अंतर पार केले आहे. टिपेश्‍वर अभयारण्यातील ‘टी 1’ या वाघिणीचा हा बछडा आहे. तीन वर्षांचा हा वाघ आपला अधिवास शोधत असून सहा जिल्ह्यांसह दोन राज्यांतून भ्रमण करीत पाच महिन्यांत 1,300 किलोमीटर अंतर पार केले आहे.

वन विभागाकडून ‘सी 1’ वाघावर 27 फेब्रुवारी 2019 ला रेडिओ कॉलर लावली तेव्हापासून त्यावर सातत्याने नजर ठेवली जात आहे. ऑक्‍टोबर 19 ते 30 या काळात हा वाघ यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विभागातील उमरखेड वनक्षेत्रात होता. 30 ऑक्‍टोबर रोजी हा वाघ यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या इसापूर अभयारण्यात कॅमेऱ्यात कैद करण्यात आला.

ऑक्‍टोबर महिन्यात ‘सी 1’ ने हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केला. नोव्हेंबर महिन्यात अकोला जिल्ह्यात त्यानंतर नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश केला. एक डिसेंबरला चिखली आणि खामगाव परिसरात आढळल्यानंतर त्याने ज्ञानगंगा अभयारण्यात प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे.

पेंच व्याघ्रसंवर्धन प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रविकिरण गोवेकर यांच्या मते, ‘सी 1’ या वाघाने ज्ञानगंगा अभयारण्यात प्रवेश करण्यापूर्वी तेलंगणातील आदिलाबाद, पांढरकवडा, किनवट, नांदेड, पैनगंगा अभयारण्य, पुसद आणि इसापूर अभयारण्य, अकोला यासह सहा जिल्हे आणि दोन राज्यांतून मोठ्या प्रमाणात संचार केला.

आपली प्रतिक्रिया द्या