
लोकसभा निवडणुकीत मतचोरी करून मोदी पंतप्रधान झाले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल यांनी केला आहे. मतचोरीच्या मुद्दय़ावर आक्रमक भूमिका घेत बिहारमध्ये काढण्यात आलेल्या मतदार अधिकार यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सी व्होटरने केलेल्या सर्वेक्षणात मतचोरीचा मुद्दा योग्यच आहे. आता निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे, असा काwल देत जनतेने राहुल गांधी यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
मतदार यादीतून नावे कापली जाण्याची भीती लोकांच्या मनात आहे. बिहारमध्ये सध्या जे काही सुरू आहे त्यामुळे मतदारांना खूपच चिंता वाटते. विरोधी पक्षांचा दावा आहे की ते प्रत्यक्षात घडत आहे, मात्र निवडणूक आयोग हा एक कट असल्याचे म्हणत आहे. 1 सप्टेंबर रोजी अंतिम यादी जाहीर होईपर्यंत ही भीती कायम राहील. लोकांच्या मनातील ही भीती दूर करणे निवडणूक आयोगाचे काम आहे, असे मत सी व्होटरचे यशवंत देशमुख यांनी व्यक्त केले.
बिहारमधील प्रयत्न वाया जाणार नाहीत
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला सुरुवातीला कमी लेखण्यात आले; परंतु नंतर कर्नाटक आणि लोकसभा निवडणुकीच्या काही भागात काँग्रेसला मदत झाली. जमिनीवर केलेले कोणतेही प्रयत्न कधीही व्यर्थ जात नाहीत. भारत जोडो यात्रेत आणि उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखालील मोहिमांमध्ये ते दिसून आले. बिहारमध्येही हे प्रयत्न वाया जाणार नाहीत, असे मतदार अधिकार यात्रेबाबत देशमुख म्हणाले.
भाजप आणि निवडणूक आयोगाने संगनमत करून देशात मतचोरी केली. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फेरतपासणीच्या नावाखाली लाखो मतदारांना मतदान यादीतून वगळण्यात येत असल्याचा मुद्दा राहुल गांधी यांनी लावून धरला आहे. त्यावर उत्तर देण्याऐवजी निवडणूक आयोग प्रतिज्ञापत्रावर लिहून द्या किंवा माफी मागा, अशी मागणी करत आहे. सी व्होटरने याबाबत सर्वेक्षण करून जनतेचा काwल जाणून घेतला. यामध्ये राहुल गांधी यांचा मतचोरीचा मुद्दा योग्य असल्याचे 60 टक्के लोकांनी मान्य केले आहे, तर 67 टक्के लोकांनी मतचोरीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोगाने योग्य उत्तर द्यावे असे म्हटले आहे.
सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, राहुल गांधींच्या मोहिमेला बिहारमधील मतदारांच्या एका महत्त्वपूर्ण वर्गात, विशेषतः जिथे काँग्रेस आणि राजदची उपस्थिती आहे, तिथं प्रतिसाद मिळत आहे.