नागरिकत्व संशोधन कायद्यात मुसलमानांनाही सामील करा! अकाली दलच्या मागणीमुळे भाजप टेन्शनमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व संशोधन कायद्यासंदर्भात शिरोमणी अकाली दल या NDA तील घटक पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे भाजप चिंतेत सापडली आहे. अकाली दलने या कायद्यातून मुसलमानांना वगळणे योग्य नसून त्यांना या कायद्यामध्ये त्यांनाही समाविष्ट करून घेतले जावे अशी मागणी केली आहे. हा कायदा पारीत झाल्यानंतर अकाली दलाचे सरचिटणीस आणि प्रवक्ते दलजीत सिंह चिमा यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की धर्माच्या नावावर अनन्वित अत्याचार सहन करणाऱ्यांना शरणार्थींना देशात आसरा मिळणार आहे. मात्र आम्हाला असे वाटते की या कायद्याच्या चौकटीमध्ये मुसलमानांचाही समावेश करण्यात यावा.

या कायद्यामुळे पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तानमधून हिंदुस्थानात स्थायिक झालेल्या हिंदू, बौध्द, शीख, जैन, पारशी लोकांना हिंदुस्थानचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना जे अधिकार आजपर्यंत मिळाले नव्हते ते अधिकार त्यांना मिळतील मात्र याची दुसरी बाजू ही आहे की मुसलमानांना यामध्ये समाविष्ट केलेले नाही असं चिमा यांनी म्हटले आहे.

अकाली दलने त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. मुसलमानांनाही या कायद्याचे संरक्षण मिळाले पाहिजे असं एनडीएतील भाजपच्या जुन्या मित्र पक्षाने म्हटले आहे. कोणावरही धर्माच्या नावावर अन्याय होऊ दिला जाऊ नये असं या पक्षाने म्हटले आहे.