‘एनआरसी’बाबत भाजपची दुटप्पी भूमिका – शरद पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘एनआरसी’बाबत असलेली नाराजी मी समजू शकतो परंतु तुमचं आंदोलन शांततेत करा. देशाच्या संपत्तीचे नुकसान करु नका आणि कायदा हातात घेऊ नक’, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील जनतेला केले. पवारांनी पत्रकार परिषद घेऊन ‘एनआरसी’बाबत भाजपची नेमकी दुटप्पी भूमिका कशी जाहीर होत आहे हे स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील एका सभेत मंत्रिमंडळ व संसदेत एनआरसीबाबत विरोध झाला नाही असे सांगितले हे चुकीचे आहे. संसदेत मी आणि आमचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एनआरसीबाबतचे दुष्परिणाम सांगितले होते. शिवाय राष्ट्रपती महोदयांनी दोन्ही सभागृहात अभिभाषणाच्यावेळी एनआरसी विषय सांगितला होता. राष्ट्रपती बोलतात ती सरकारची पॉलिसी ठरलेली असते तेच बोलले जातं. देशाचे गृहमंत्री एनआरसीचा निर्णय देशासाठी घेतल्याचे सभागृहात सांगतात आणि दुसरीकडे पंतप्रधान वेगळे बोलतात यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

#JharkhandResults भाजपच्या हातून झारखंडही निसटलं! पवारांची पहिली प्रतिक्रिया

सत्तेत बसलेल्या लोकांनी शांततेने पाऊले टाकायची असतात परंतु सध्याचे सरकार ज्यापध्दतीने धार्मिक अंतर ठेवण्याचा आणि एकतेला ठेच पोहचेल अशी पाऊले टाकताना दिसत आहे असा आरोपही शरद पवार यांनी केला. एनआरसी विरोधात देशातील एक मोठा हिस्सा रस्त्यावर उतरून आपली नाराजी व्यक्त करत आहे. परंतु हे आंदोलन शांततेत करा असे आवाहन शरद पवार यांनी केले.