
‘सीएए’ आणि ‘एनआरसी’विरोधात देशासह राज्यातील विविध भागांत होणाऱ्या आंदोलनांमुळे हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्या अशा सूचना राज्य बालहक्क आयोगाने शालेय शिक्षण विभागाला दिल्या आहेत.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, प्रमुख रस्त्यांवर आंदोलनांचा भडका उडत आहे. यामुळे वाहतुकीचे मार्ग, प्रमुख रस्ते बंद करण्यात येत आहेत. ही परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना कराव्यात अशा सूचना बालहक्क आयोगाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी दिल्या आहेत.
पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी, शिक्षण आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात, असे आदेश दिले आहेत.
























































