नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन,उत्तर प्रदेशात 19 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (सीएए) देशभरात आंदोलने सुरू असताना उत्तर प्रदेशमध्ये उसळलेल्या हिंसाचारात आणि पोलीस गोळीबारात आतापर्यंत 19 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर हिंसाचारप्रकरणी 1,113 जणांना अटक केली आहे. खबरदारी म्हणून 5,558 जणांवर कारवाई केली आहे. दरम्यान, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या 130 आंदोलकांकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने 50 लाख रुपये भरपाई वसूल करण्याचे आदेश जारी केले आहेत. ‘सीएए’विरोधातील आंदोलनात उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत फिरोझाबादमध्ये 5, मेरठमध्ये 4, कानपूरमध्ये 3, संबळ आणि बिजनोर येथे प्रत्येकी दोन, तर मुजफ्फरनगर, रामपूर आणि लखनौ येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

130 आंदोलकांकडून 50 लाख वसूल करणार
सीएएविरोधी आंदोलनातील हिंसाचारात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार 130 आंदोलकांना 50 लाख रुपये नुकसानभरपाई भरण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. बुधवारी रामपूर येथे 28, संभल 26, बिजनोर 43 आणि गोरखपूरमध्ये 33 जणांना नोटीस बजावली आहे. नोटिसीतील आकडेवारीनुसार रामपूरमध्ये 14.86 लाख रुपये, संभलमध्ये 15 लाख रुपये आणि बिजनोरमध्ये 19 लाख रुपयांच्या मालमत्तेचे हिंसाचारात नुकसान झाले आहे. दगडफेक करताना आणि मालमत्तेचे नुकसान करताना जे आंदोलक कॅमेऱ्यात कैद झाले त्यांनाच नोटीस बजावली आहे. नोटिसीला उत्तर देण्यासाठी आंदोलकांना एक आठवडय़ाची वेळ दिली आहे. या हिंसाचारात उत्तर प्रदेश पोलीस दलातील 351 पोलीस जखमी झाले.