
उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये द हिंदू या वर्तमानपत्राच्या पत्रकाराला पोलिसांनी उचलून नेलं. पोलीस ठाण्यात या पत्रकाराला दमदाटी करण्यात आली. पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर उमर रशीद नावाच्या या पत्रकाराने त्याच्यासोबत काय घडलं ते सविस्तर पद्धतीने सांगितलं आहे. रशीदने पत्रकारांशी बोलताना म्हटले की त्याला पोलिसांनी लखनऊमधल्या भाजपच्या कार्यालयाजवळून ताब्यात घेतलं. मी काही ओळखीच्यांसोबत या ढाब्यावर खात असताना, पोलिसांनी त्या ओळखीच्या व्यक्तींसोबत मलाही उचलून नेल्याचं रशीदने म्हटलं आहे.
रशीद हा उत्तर प्रदेश सरकारने बोलावलेल्या पत्रकार परिषदेसाठी आला होता. तो आणि रॉबिन वर्मा नावाचा एक त्याचा ओळखीचा माणूस असे दोघे जण ढाब्यावर खात होते. तिथे साध्या वेषातील चार पोलीस आले आणि त्यांनी रशीद आणि रॉबिन या दोघांना हजरतगंज पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी रॉबिनला मारहाण करायला सुरुवात केली आणि मला धमकवायला सुरुवात केली असं रशीदने म्हटलं आहे. ‘मला इथे का आणलं आहे?’ असं रशीदने पोलिसांना विचारलं तेव्हा पोलिसांनी त्याला कटात सहभागी झाल्याच्या आरोपाखाली अटक करू अशी धमकी दिली.
पोलिसांनी रशीदवर आरोप केला की नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाल्याचा आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली आहे. या आरोपांचा रशीदने इन्कार केला आणि त्याचं ओळखपत्र दाखवलं. ‘ओळखपत्र दाखवल्यानंतर एका पोलिसाने मला म्हटलं की तुझी पत्रकारिता तुझ्याकडे ठेव’. रशीद हा मूळचा कश्मीरचा रहिवासी असल्याने पोलिसांनी त्याला इतर कश्मिरींना कुठे लपवून ठेवलं आहे असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. जर उत्तर दिलं नाही तर तुझी दाढी उपटून टाकेन अशी धमकी एका पोलिसाने दिल्याचंही रशीदने म्हटलं आहे.
























































