सीएसएमटीजवळ कॅब चालकाला बेदम मारहाण, पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

सीएसएमटी स्थानकाजवळ पोलीस हेड कॉन्स्टेबलने कॅब चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. मारुफ अमहद खान असे मारहाण झालेल्या कॅब चालकाचे नाव आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी हेड कॉन्स्टेबल रूपेश माणिक रणदिवे यांना निलंबित केले आहे.

काय आहे प्रकरण?

कॅब चालकाने केलेल्या दाव्यानुसार, तो सीएसएमटी स्थानकाजवळ पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास प्रवासी घेण्यासाठी थांबला होता. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल रणदिवे यांनी कॅब चालकाला गाडी हलवण्यास सांगितले. कॅब चालकाने प्रवासी येत असल्याचे रणदिवे यांना सांगितले. मात्र रणदिवे यांनी कॅब चालकाला आधी चापट मारली. कॅब चालक तेथून निघेपर्यंत त्यांनी मारहाण सुरुच ठेवली. या मारहाणीत कॅब चालकाच्या पाठीवर जखमा झाल्या आहेत.

या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर पोलीस उपायुक्तांनी हेड कॉन्स्टेबल रणदिवे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. कॅब चालकाला उपचारासाठी जीटी रुग्णालयात नेण्यात आले.