
टीव्ही केबलमध्ये वीजप्रवाह उतरल्याने शहरातील उदयोन्मुख खेळाडूचा मृत्यू झाल्याची घटना विनायकनगर परिसरात घडली आहे. दरम्यान, या घटनेला संबंधित यंत्रणा जबाबदार असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी दिली.
अजिंक्य सुरेश गायकवाड (वय 28) असे मृताचे नाव आहे. अजिंक्य गायकवाड टीव्ही पाहत असताना व्यवस्थित दृश्य दिसत नव्हते. त्यामुळे केबल तपासण्यासाठी टीव्हीजवळ जाऊन त्याने केबलला हात लावला. त्यावेळी धक्का बसून त्याचा मृत्यू झाला.
अजिंक्य याने गोळाफेकमध्ये अनेक पुरस्कार मिळविले आहेत. माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांचा तो मुलगा आहे.
चार हजार व्होल्टचा वीजप्रवाह
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस किंवा वीज कंपनीकडून कोणीही पाहणी करण्यासाठी आले नाही. गायकवाड हे ‘जागरूक नागरिक मंचा’चे सदस्य आहेत. मंचाचे अध्यक्ष मुळे स्वतः अभियंता आहेत. त्यांनी आणि मकरंद घोडके यांनी घटनास्थळाची पाहणी केली, तेव्हा धक्कादायक माहिती पुढे आल्याचे मुळे यांनी सांगितले.
ज्या केबलचा धक्का बसला, त्यामध्ये सुमारे चार हजार व्होल्टला वीजप्रवाह उतरलेला होता. ही केबल उच्च दाब वीजवाहिनीच्या खांबांवरून, तारांवरून टाकत घरात आणलेली होती. संपूर्ण शहरात असेच विजेच्या तारांमध्ये टीव्ही केबलचे जाळे झालेले पाहायला मिळते. वीज वितरण कंपनी आणि मनपा अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मुळे यांनी केला आहे. त्यामुळे जागरूक नागरिक मंचातर्फे संबंधितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.























































