त्वचेपासून जीभ तयार करून कॅन्सरग्रस्ताला नवसंजीवनी, नामको रुग्णालयातील घटना

जिभेच्या कर्करोगाने बांधकाम मजूर ग्रस्त झाला होता. आजाराच्या तीव्रतेमुळे शस्त्र क्रियेशिवाय पर्याय नव्हता. मात्र, नामको रुग्णालय आणि तिथल्या डॉक्टरांनी हाताच्या त्वचेपासून जीभ तयार करून या मजुराला नवसंजीवनीच दिली. विज्ञान आणि विश्वासाच्या बळावर आयुष्याची उमेद अन् आशेचा नवा सूर कसा गवसतो याचेच हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

सुमारे दीड वर्षापूर्वी 57वर्षीय बांधकाम मजुराला तोंडात वेदनादायी जखम जाणवत होती. बोलणे अन् खाणेही कठीण झाल्याने डॉक्टरांनी तपासण्या केल्या असता जिभेच्या कर्करोगाचे निदान झाले. तो चौथ्या पातळीपर्यंत पोहोचला असल्याने शस्त्र क्रियेशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे कुटुंबीयांमध्येही भीतीची अन् चिंतेची लाट पसरली. नामको हॉस्पिटलमधील ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जन प्रथमेश कपूर व त्यांच्या चमूने हाताच्या त्वचेपासून नवीन जीभ तयार करण्याचा धाडसी निर्णय घेतला. प्रत्येक स्नायू आणि रक्तवाहिनी सांभाळत कुशलतेने हाताच्या त्वचेपासून जिभेचे पुनर्निर्माण करण्यात आले. ती जीभ मजुराच्या तोंडात योग्य रितीने बसवण्यात आली. आवाज बदलला असला तरी या जिभेमुळे बोलू, खाऊ शकत असल्याने त्याला जगण्याचा नवा विश्वास मिळाला. पॅन्सरमुळे रेडिएशन, केमोथेरपीसारख्या कठीण प्रसंगांना त्याला सामोरे जावे लागले. शरीर थकले तरी त्याच्या मनाने हार मानली नाही. उपचार पूर्ण करून तो घरी परतला.