
माणूस आपल्या व्यावसायिक फायद्याकरता बऱ्याचदा निसर्गाचा वापर करतो. पण, कधी कधी हाच वापर त्याच्या मुळावर उठलेला पाहायला मिळतो. असाच एक प्रकार दक्षिण आफ्रिकेत घडला आहे.
दक्षिण आफ्रिकेत नील मगरींची संख्या जास्त आहे. येथील बोनविलेव नावाच्या एका मगरींसाठीच्या फार्ममधून काही मगरींनी ब्री नदीत स्थलांतर केले आहे. या मगरी मनुष्यावर हल्ला करून त्यांना खातात. म्हणून त्यांच्यापासून लोकांचे रक्षण व्हावे याकरिता आफ्रिकेतील पोलीस प्रशासनाने या मगरींकरिता शोधमोहीम सुरू केली आहे.
या मगरींची लांबी 1.2 ते 1.5 मीटर असते. आतापर्यंत या मोहिमेअंतर्गत मनुष्यावर हल्ला करणाऱ्या 26 मगरींना पकडण्यात यश आले आहे, मात्र त्यांची एकूण संख्या किती आहे, याविषयी आम्हाला माहिती नाही. या मगरी येथील लोकांवर हल्ला करण्यासाठी त्यांच्या घरापर्यंतही पोहोचतात. ते लोकांकरिता अत्यंत धोकादायक आहे, अशी माहिती आफ्रिकेतील केपेनेचर संस्थेचे प्रवक्ता पेट्रो वान राइन यांनी दिली आहे.
नील जातीच्या काही मगरी त्यांचे मुक्कामाचे ठिकाण सोडून नदीत गेल्या आहेत. ही गोष्ट एक दिवस एका शेतमालकाच्या लक्षात आली. तेव्हापासून पोलीस प्रशासन या मगरींचा शोध घेत आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेत चामड्याच्या उत्पादनाकरिता नील मगरी पाळल्या जातात. गोड्या पाण्यात या मगरी 5 मीटरपर्यंत वाढतात. एका प्रौढ नर मगरीचे वजन अर्ध्या टनापेक्षाही जास्त असते. केप प्रांतातील सरकारचे प्रवक्ता जम्स ब्रेंट स्टेन यांनी नील मगरींचे पालन करणाऱ्या लोकांच्या आजूबाजूच्या परिसरातील नद्या स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले आहे.
तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, या लोकांनी पाळलेल्या मगरी कोणाचीही शिकार करत नाहीत. त्यांचे पालन करणारी लोकंच त्यांच्या भोजनाची व्यवस्था करतात. पण, नदीत त्यांना भोजन न मिळाल्यामुळे त्या माणासावर हल्ले करत आहेत.