
मुंबईत झाडे दरवर्षी पडतात. रस्त्यांच्या सिमेंट-काँक्रीटीकरणामुळे झाडे पडतात असे ठामपणे म्हणता येणार नाही, अशी सारवासारव पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत 830 झाडे पडली आहेत. वर्षभरात जितकी झाडे पडतात, त्यापैकी जवळपास 50 टक्के झाडे एका दिवसात कोसळली. मुंबईत गेल्या तीन-चार दिवसांत वाऱयाचा वेग ताशी 70 ते 80 किलोमीटर इतका होता. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात झाडे, फांद्या जास्त प्रमाणात पडल्या, असे आयुक्त म्हणाल्या. सिमेंट-काँक्रीटीकरणाचे काम रस्त्यांवर होते. झाडे फुटपाथवर असतात. त्यामुळे सिमेंट-काँक्रीटीकरणाने झाडे पडली, असे सरसकट म्हणता येणार नाही. जर यासंदर्भात डेटा आधारित पुरावे असतील तर त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल असे वक्तव्य महापालिका आयुक्तांनी केले.
तज्ञांची मदत घेतली जाणार
पालिका प्रशासन मुंबई विद्यापीठातील काही तज्ञांकडून तसेच आयआयटीकडूनही याबाबत उपाययोजना जाणून घेणार आहे. जमिनीत खोलवर गेलेल्या झाडांच्या मुळांना पाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच झाडांची शास्त्रोक्तपणे छाटणी करण्यावरही भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- मुंबईत 2022 मध्ये 655 झाडे पडली होती, 2023 मध्ये 687, 2024 मध्ये 653 आणि 2025 मध्ये 855 झाडे पडली. तर 2026 मध्ये 830 झाडे पडली. 830 पैकी 480 झाडे खासगी क्षेत्रातील होती. यंदा 1 हजार 238 इतक्या फांद्या पडल्या. त्यापैकी 709 या खासगी क्षेत्रातील होत्या, अशी माहिती आयुक्तांनी दिली.




























































