खर्डी रेल्वे स्थानकातील उपाहारगृह चार महिन्यांपासून बंद; पुरेशा सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल

कल्याण मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील खर्डी स्थानक रेल्वे प्रशासनाकडून अजूनही दुर्लक्षितच आहे. येथील उपाहारगृह गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याने स्थानकात चहापानची सोय नसल्याने लोकलने ये जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वेने खर्डी स्थानकातील उपाहारगृह लवकर सुरू करावे तसेच पुरेशा सुविधा द्याव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.

खर्डी येथून मुंबई, ठाणे, कल्याण, शहाड येथे नोकरी, व्यवसायासाठी ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. खर्डी परिसराचा ‘विक अॅण्ड होम’ मुळे मोठ्या प्रमाणात विकास होत असून त्या तुलनेत रेल्वे प्रशासनाने येथील सोयीसुविधांकडे लक्ष न दिल्याने प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर, भातसा धरणावर जाण्यासाठी पर्यटक येथे उतरत असतात. विद्यार्थी, आबालवृद्ध व महिला यांना स्थानकात चहाही मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. येथील समस्या दूर करण्यास रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप दळखणचे माजी सरपंच भगवान मोकाशी आणि कसारा कर्जत प्रवासी सघटनेचे सदस्य विशाल जाधव यांनी केला आहे.

खर्डी येथील रेल्वे स्थानकावरील उपाहारगृहाचे भाडे परवडत नसल्याने ठेकेदाराने उपाहारगृह बंद केले आहे. यामुळे प्रवाशांची अडचण झाली असून येथील उपाहारगृह सुरू करण्यासाठी कोणी अर्ज केल्यास त्याला प्राधान्य देण्यात येईल.
चरण सिंग, स्टेशन मास्तर