
- कॅप्टन नीलेश गायकवाड
देशात गेल्या 8-10 वर्षांमध्ये एपंदरीतच पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना दिली जात आहे. यामध्ये रस्तेमार्गांचा विकास झपाटय़ाने होत आहे. राष्ट्रीय महामार्गांनी देशातील मोठमोठी शहरे जोडली जात आहेत. यामुळे रस्तेमार्गाने पर्यटनाला जाणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. त्यातूनच ‘हायवे टुरिझम’ ही नवी संकल्पना उदयाला आली आहे. लांबच लांब, प्रशस्त महामार्गांवरून खासगी अथवा प्रवासी वाहनाने पर्यटनस्थळी जाणे आणि जाताना वाटेवरच्या सोयीसुविधांचा मनमुराद आनंद घेणे याकडे पर्यटकांचा कल वाढत आहे.
शेकडो मैल अंतराचा प्रशस्त महामार्ग आणि त्यावर गतिमानतेने वाहन चालवत जाण्यात एक वेगळीच मजा असते. एक्स्प्रेस हायवे, महामार्गावरून वाहन नेताना ठिकठिकाणी दिसणाऱ्या अत्याधुनिक सुविधा पाहून चालक आणि प्रवासी अधिकच आनंदी होतात. गेल्या काही वर्षांत आपल्या देशात महामार्ग पर्यटन ही नवीन संकल्पना नावारूपास आली असून त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरात झपाटय़ाने होणाऱ्या रस्तेमार्गांच्या विकासामुळे पर्यटनाला प्रचंड चालना मिळत आहे. याबाबतची आकडेवारी उत्साहवर्धक आहे. गेल्या वर्षी वैष्णोदेवीची यात्रा करणारे सुमारे 78 लाख भाविक हे रस्तेमार्गाने गेले. महाराष्ट्राचा विचार केल्यास नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग आणि नव्याने विकसित होणारा मुंबई-नवी दिल्ली महामार्ग हा राज्यातील हायवे टूरिझमला बूस्ट करणारे रस्ते ठरू शकतात.
सिमला, मनालीसारखे थंड हवेचे ठिकाण असलेल्या हिमाचल प्रदेशात सुमारे गतवर्षी 35 लाख नागरिक आपल्या वाहनातून दाखल झाले. 35 ते 40 लाख नागरिक रस्तेमार्गानेच राजस्थानला गेले. त्याच वेळी 35 ते 40 लाख पर्यटक हे पंजाबला आपापली गाडी किंवा बस घेऊन फिरायला गेले. विशेष म्हणजे या पर्यटकांपैकी एकही पर्यटक हरियाणाला गेला नाही. मात्र सुमारे 80 टक्के रस्ते हरियाणातील विविध भागांतून गेलेले असल्याने याच महामार्गाने पर्यटक पंजाबला पोहोचले. म्हणूनच अन्य राज्यांच्या तुलनेत हरियाणाला सर्वाधिक महसूल मिळाला हे विशेष.
राजस्थानला किंवा हिमाचलला किंवा जम्मू कश्मीरला जाणारे पर्यटक एक ते दोन वेळा हरियाणात थांबले, खानपान केले, आराम केला आणि महामार्गालगत उभारलेल्या पर्यटन टूरचा आनंद घेतला. अर्थकारणाच्या दृष्टीने पाहिले तर पंजाब, हिमाचल किंवा जम्मू कश्मीरच्या तुलनेत हरियाणात कमी पर्यटक येतात. परंतु पर्यटकांकडून मिळणाऱ्या उत्पन्नात हरियाणाची स्थिती ही अन्य राज्यांच्या तुलनेत चांगली आहे. याशिवाय हरियाणाने महामार्ग पर्यटनाचे महत्त्व जाणून घेतले आणि त्यादृष्टीने प्रयत्न केले. हरियाणातून सुमारे 34 राष्ट्रीय महामार्ग जातात. त्यातले 11 एक्स्प्रेस-वे असून त्यात तीन राष्ट्रीय महामार्ग आहेत. तसेच या राज्यात 33 राज्य महामार्ग आहेत. हरियाणात रस्त्यांचे समृद्ध जाळे पसरले असून त्याची लांबी सुमारे 35 हजार किलोमीटर एवढी आहे. हरियाणा राज्य पर्यटन महामंडळाने महामार्गालगत शेकडो मोटेलची उभारणी केली आहे. तेथे दरवर्षी सुमारे 80 लाख पर्यटक थांबतात. हरियाणात पर्यटक येण्याचे प्रमाण कमी असले तरी महामार्गालतच्या पर्यटन विकासामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चांगली चालना मिळत आहे. महाराष्ट्राचा विचार करता आपल्या राज्याला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य, नितांतसुंदर समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणे, गडकिल्ले, स्थापत्यकलेचे अद्भूत आविष्कार, लेण्या, अॅग्रो टुरिझम यांसारख्या ठिकाणांना भेटी देण्यासाठी देशविदेशातून लाखो पर्यटक येत असतात. याखेरीज कर्नाटक, गोवा यांसारख्या राज्यांमध्ये जाण्यासाठी महाराष्ट्रातील महामार्गांवरून जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण मोठे आहे. महाराष्ट्रातील महामार्गांवरील हॉटेल्स, रेस्टॉरंटस् आदी ठिकाणी नेहमीच परराज्यांतील पर्यटकांची रेलचेल दिसून येते.
भारतात हायवे टूरिझमचा इतिहास सुमारे तीस वर्षापेक्षा अधिक आहे. देशातील राष्ट्रीय महामार्ग आणि द्रूतगती महामार्गाची निर्मिती आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. या महामार्गावरील सुविधांमुळे आणि छोटय़ामोठय़ा आकर्षक ठिकाणांमुळे वाहनचालक आणि पर्यटक परिसरातील पर्यटनाचादेखील आनंद घेऊ शकतात. अलीकडील काळात उत्तर भारतात हायवे पर्यटनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. हरियाणानेही त्याचे महत्त्व ओळखून पायाभरणी केली. आज बहुतांश राज्यांमधील महामार्गांनजीकच्या प्रमुख शहरात 3-3, 4-4 किलोमीटर मागे आणि पुढे शानदार हॉटेल आणि मॉटेल आहेत. महाराष्ट्रात अस्सल मराठमोळय़ा पदार्थांची मेजवानी उपलब्ध करून देणारी असंख्य हॉटेल्स देशी-विदेशी, स्थानिक पर्यटकांसाठी पर्वणी ठरताना दिसताहेत. याखेरीज या महामार्गांलगतच्या भागातील शेतकरी त्यांच्या शेतातील ताज्या भाज्या, फळे, मध, काकवी, गूळ यांसारखी उत्पादने, शेवया, कुरडय़ा, हळद, पापड, नाचणी यांसारखी सकस उत्पादने महामार्गांनजीक विकताना दिसू लागले आहेत. या सर्व सुविधांचा सकारात्मक परिणाम मध्यमवर्गीयांवर झाला आहे. त्यामुळेच आज आपल्या मोटारीतून कुटुंबासह सैर करणाऱ्या मंडळींनी या सुसज्ज महामार्गाला पसंती देत आहेत.
महाराष्ट्राचा विचार केल्यास मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा महामार्ग पर्यटनाचा आदर्श नमुना आहे. हा द्रुतगती मार्ग केवळ शंभर किलोमीटरचा असला तरी या मार्गावर थांबणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. महामार्गालगतचे हॉटेल्स, रेस्टॉरंट, फास्टफूड सेंटर, पेट्रोल पंपची सुविधा आदी गेष्टी स्थानिक प्रवाशांना भुरळ पाडतात. परराज्यातील वाहनांनादेखील हा एक्स्प्रेस वे सुखद अनुभव देतो. त्यात आता मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची भर पडत आहे.
एका अंदाजानुसार देशातील संपूर्ण महामार्गाच्या पर्यटनाची उलाढाल ही आगामी काळात सुमारे वार्षिक 80 हजार कोटी रुपये राहू शकते. त्याच वेळी तज्ञांच्या मते, भारतात हायवे टूरिझमची उलाढाल ही दहा लाख कोटीपेक्षा अधिक आकडा गाठू शकते. वास्तविक नवीन पिढी सेल्फ ड्रायव्हिंग पर्यटनाला पसंती देत आहेत. नव्याने येणाऱ्या गाडय़ा अधिक आरामदायी आणि रस्तेही चांगले असल्याने दीर्घकाळ गाडी चालवल्याने थकवा येत नसल्याचे दिसून येते. प्रशस्त आणि सुरक्षित महामार्गावर गाडी चालवण्याचे वेड दिवसेंदिवस वाढत चालले आहे. परिणामी रस्त्यालगतचे पर्यटन आणखीच बहरण्याची शक्यता वाढली आहे.
आर्थिक गणिताचा विचार केल्यास एका अंदाजानुसार महामार्गालगतच्या हॉटेलमध्ये जेवणाऱ्या, मुक्काम करणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 2018-19 या काळात सुमारे पर्यटकांची संख्या 3 कोटींवर पोहोचली. परंतु 2020-21 मध्ये कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय ठप्प पडला. मात्र 2021-22 मध्ये आणि 2022-23 मध्ये पर्यटक पुन्हा घराबाहेर पडले.