
सुरुवातीला सलग तीन पराभवांचा फटका बसलाय म्हणून मान खाली खाली घालून बसायचे कारण नाहीय. विजयाची ऊर्मी मनात जागवून नेटाने मैदानात उतरा. अजून बरेच सामने आपल्याला खेळायचे आहेत. यापूर्वीच्या हंगामांतही मुंबई संघाने सुरुवातीच्या लढतींत आपल्या संघाला अपयश पत्करावे लागले होते. पण त्यातूनही मुंबईने फिनिक्स भरारी घेत अनेकदा थेट जेतेपदापर्यंत मजल मारली होती हे विसरू नका, असा कानमंत्र मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने बंगळुरूविरुद्धच्या लढतीपूर्वी आपल्या संघसहकाऱयांना दिला आहे.
मुंबई आता जरी पराभवाच्या गर्तेत सापडली असली तरी आपल्या संघाला विजयपथावर नेण्यासाठी आपण सर्वानीच निराशा झटकून विजयाची ऊर्मी जागवून मैदानात उतरूया असे आवाहन हिटमॅन रोहित शर्माने केले.
पराभवासाठी वैयक्तिक कुणी जबाबदार नाही
मुंबईच्या पराभवांसाठी कुणा एका खेळाडूला वैयक्तिकरीत्या मी जबाबदार मानत नाही. आपण संघ म्हणून जिंकतो आणि पराभवही संघ म्हणून सामुदायिकरीत्या स्वीकारायचा असतो, असे कर्णधार रोहित म्हणाला. आता तरी विजयासाठी स्वतःला झोकून द्या. मी विश्वासाने सांगतो, यश आपल्याला निश्चितच लाभेल, असेही रोहितने शेवटी सांगितले.























































