अल्पवयीन मुलाच्या माध्यमातून वाहन चोरणाऱ्यास अटक

27

सामना प्रतिनिधी । नांदेड

जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनावरुन वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले, विशेष पोलीस शाखेचे प्रवीण राठोड आणि त्यांच्या पथकाने वाहन चोरीचा तपास करुन अल्पवयीन मुलांमार्फत चोरी करणाऱ्या वाहन चोरास व ती वाहने विकणाऱ्यास शिताफीने अटक केली.

प्रफुल्ल भिसे (२५) आणि दिनेश सिध्दार्थ भिसे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांची करण्याची पध्दत अशी आहे. एका अल्पवयीन मुलास त्यांनी मास्टरकी (गुरुकिल्ली) बनवून दिली आहे. या मास्टरकीच्या आधारे तो अल्पवयीन मुलगा वाहन चोरत असे व ते वाहन या दोन आरोपींच्या ताब्यात देत असे. नंतर त्यापैकी एक आरोपी ते वाहन विकत असत.

सुमारे एक महिन्यांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील सुगाव येथील एक अल्पवयीन मुलगा वाहन चोरतो अशी बातमी कळाल्यावरुन संदीप शिवले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास केला. त्या अल्पवयीन मुलाने सांगितलेल्या माहितीनुसार या दोन आरोपींचा शोध घेतला. अखेर मुंबई येथे मेट्रोचे काम करीत असताना हे दोन्ही आरोपी सापडले. प्रथम ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. परंतू ताब्यात घेतल्यानंतर पोलीसी खाक्या दाखविताच त्यांनी शहरातील वजिराबाद, शिवाजीनगर, भाग्यनगर या हद्दीतून वाहने चोरल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, २० जुलैपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सूनावण्यात आली आहे.

वाहन चोरी टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी काही उपाय सांगितले. ते म्हणाले की, दुचाकी वाहनास साखळीने बांधून कुलूप लावणे हे सर्वात सुरक्षित असते. याशिवाय वाहन धारकांनी आपली वाहने असुरक्षित ठिकाणी थांबवू नये. घराच्या कुंपणात वाहनास जागा नसेल तर बाहेर एखाद्या झाडास किंवा फाटकास वाहन साखळीने बांधून ठेवावे.

आपली प्रतिक्रिया द्या