लॉकडाऊनमध्येही घरबसल्या सराव! जगज्जेता कॅरमपटू प्रशांत मोरेचे उद्गार

568

कोरोना व लॉकडाऊनच्या काळात सर्व काही ठप्प असल्यामुळे क्रीडाक्षेत्रावरही याचा परिणाम दिसून आला. मात्र बुद्धिबळ व कॅरम या दोन खेळांना याचा फटका बसला नाही. याच पार्श्वभूमीवर जगज्जेता कॅरमपटू प्रशांत मोरे याच्याशी दैनिक ‘सामना’ने संवाद साधला. यावेळी तो म्हणाला, लॉकडाऊनमध्ये कॅरमपटूंना घरबसल्या सराव करता आला. ऑनलाईन स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले. त्यामुळे यावेळी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग झाला असेच म्हणावे लागेल.

ऑनलाइन स्पर्धांमुळे उत्साह वाढला

कॅरम हा घरच्या घरी खेळता येतो. त्यामुळे लॉकडाऊनमध्येही खेळाडूंनी घरी बसून या खेळाचा कसून सराव केला. ऑल इंडिया कॅरम फेडरेशनकडूनही दोन ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धांना सिनको या कंपनीकडूनही बक्षीसे देण्यात आली. त्यामुळे कॅरमपटूंचा उत्साह काढला, असे प्रशांत मोरे याने आवर्जून सांगितले.

आता हॉलमध्ये खेळाडूंनाच प्रवेश असेल

कोरोनामुळे प्रत्येक खेळाच्या नियमात थोडाफार बदल होईलच. कॅरममध्येही काही बदल होणे अपेक्षित आहे. स्पर्धा सुरू असलेल्या हॉलमध्ये यापुढे फक्त स्पर्धकांनाच संधी देण्यात येईल. कॅरमप्रेमींना प्रवेश मिळेल असे वाटत नाही, असे प्रशांत मोरे याला वाटते.

आता छंद नव्हे तर करीअर

काही वर्षांपूर्वी कॅरम या खेळाकडे फक्त छंद म्हणून बघितले जात होते. पण आता कायापालट झाला आहे. कोरोना व लॉकडाऊनमध्ये तर या खेळाचे महत्त्व सर्वांनाच पटू लागले आहे. लहानांपासून वयस्करांपर्यंत सर्वानीच या लॉकडाऊनमध्ये कॅरमचा आनंद घेतलाय. आता या खेळामध्येही करिअर होऊ शकते असे युवा खेळाडूंना वाटू लागले आहे, असे प्रशांत मोरे ठामपणे म्हणाला.

होतकरू खेळाडूंना केली आर्थिक मदत

कोरोनाच्या काळात सर्व काही बंद असल्यामुळे होतकरू कॅरमपटूंचे हाल झाले आहेत. अशा कॅरमपटूंना मी माझ्या काही मित्रांच्या सहाय्याने आर्थिक मदत केली. त्यामुळे समाधान मिळाले, असे भावूकपणे प्रशांत मोरे म्हणाला.

युवा खेळाडूंना ऑनलाइन मार्गदर्शन

या लॉकडाऊनमध्ये मी युवा खेळाडूंना ऑनलाईन मार्गदर्शन केले. यामध्ये पहिल्या सेशनमध्ये खेळताना शरीराची दिशा कशी असायला हवी. सोंगटय़ा कशा घालवायला हव्यात याचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर शॉटवर मेहनत घेण्यात आली. तिसऱया सेशनमध्ये ऍडव्हान्स शॉट आणि अखेरच्या सेशनमध्ये लढतीच्या दिवशी बॉडी लँग्वेज कशी असायला हवी. डाएट काय असायला हवे. दबावाखाली कसे खेळायला हवे याबाबत टीप्स देण्यात आल्या, असे प्रशांत मोरे याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या