‘वर्क फ्रॉम होम’ मुळे पाठदुखीच्या समस्येत वाढ….अशी घ्या मणक्यांची काळजी…

कोरोना महामारीमुळे आणि लॉकडाऊनमुळे अनेकजण घरातूनच काम करत आहेत. मात्र, या ‘वर्क फ्रॉम होम’ मुळे आरोग्याशी संबधित समस्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कार्यालयात काम करताना योग्य ती आसनव्यवस्था असते. मात्र, घरातूनच काम करताना योग्यप्रकारे बसण्याकडे आपले दुर्लक्ष होते. त्यामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ मुळे पाठदुखीच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पाठीच्या समस्या वाढून स्पॉडिलायसिस किंवा स्लीप डिस्कसारखे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे अशा आजारापासून दूर राहण्यासाठी तज्ज्ञांनी काही सोपे उपाय सुचवले आहेत.

शरीराचे वजन पेलून तोल सांभाळण्याचे काम पाठीचा कणा करत असतो. त्यात मणक्यांची महत्त्वाची भूमिका असते. पाठीच्या कण्यामुळे मज्जारज्जूंचे संरक्षण होते. त्यामुळेही पाठीच्या कण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. निरोगी आरोग्यासाठी पाठीचा कण आणि मणके तंदुरुस्त असणे महत्त्वाचे असते. बसण्याच्या चुकीच्या पद्धती, सुखासीन जीवनशैली आणि वजन वाढण्याने पाठदुखीच्या समस्या निर्माण होतात. नेहमी ताठ बसणे हे पाठीचा आणि मणक्यांसाठी खूप गरजेचे आहे. मात्र, याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. पाठदुखीला नुकतीच सुरवात झाली असेल तर व्यायाम आणि योगा करून हा त्रास नियंत्रणात आणता येतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. तसेच मोबाईल, संगणकाचा अतिवापर टाळावा आणि कामासाठी सलग दीर्घकाळ बसणे टाळावे. कामामध्ये विश्रांती घेत थोडे चालल्यास मणक्यांची हालचाल होते. त्यामुळे कण्यावर ताण येत नाही.

मणक्याचे एकूण 33 भाग असतात. वजन वाढल्याने किंवा कोणत्याही कारणाने त्यावर ताण आला किवा सूज आली तर पाठदुखीला सुरुवात होते. त्यामुळे वाढणाऱ्या वजनाचा आणि पाठदुखीचा जवळचा संबंध असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे नियमित व्यायाम करून वजन नियंत्रणात राहील याची काळजी घेण्याची गरज आहे. पूर्वी अपघातग्रस्त किंवा वृद्ध व्यक्तींमध्ये पाठदुखीची समस्या जाणवत होती. मात्र, आता वर्क फ्रॉम होममुळे अनेकांमध्ये पाठदुखीची समस्या वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच ऑनलाईन क्लासमुळे काही विद्यार्थ्यांमध्येही पाठदुखीची समस्या दिसून येत आहे. त्यामुळे सुखासीन जीवनशैली आणि बैठे काम असल्यास नियमित व्यायामाची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

शरीरात वंगणाची कमतरता निर्माण झाल्यास हाडांची झीज होते. त्यामुळेही पाठदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे सकस आहाराकडे लक्ष द्यावे. हाडांच्या मजबुतीसाठी प्रथिने आणि कॅल्शियम गरजेचे आहे. त्यामुळे हे घटक असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. मुलांना मैदानी खेळ खेळण्यास आणि सूर्यप्रकाशात व्यायाम करण्यास प्रोत्साहन द्यावे. मुलांना मोबाईलचे व्यसन लागत असल्याने त्यांच्यातही पाठदुखीची समस्या दिसून येत आहे. ताठ बसणे, व्यायाम, आहार विहार आणि जावनशैलीत काही बदल केल्यास पाठदुखीपासून सुटका होऊ शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या