कॅन्सरवर मुंबईतील शास्त्रज्ञांची रामबाण थेरपी, ‘स्टेज-4’च्या आजारावरही मात करणे शक्य

1568

कर्करुग्णाच्या शरीरातील चांगल्या पेशी कायम ठेवून फक्त कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करणारी ‘कारटी-सेल्स थेरपी’ पवईतील आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडियोथेरपीपेक्षाही कमी वेदनादायी अशी ही थेरपी अगदी ‘स्टेज-4’च्या कर्करुग्णांसाठी संजीवनीच ठरणार आहे. विशेष म्हणजे या थेरपीने उपचार केल्यावर कर्करोग पुन्हा डोके काढण्याची शक्यताही मावळते.

आयआयटी मुंबईतील बायोसायन्सेस ऍण्ड बायोइंजिनीयरिंग विभागातील प्राध्यापक राहुल पुरवार यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या टीमने ही कमाल केली आहे. ‘जीनथेरपी’ आणि ‘सेलथेरपी’ यांचा संयुक्तरीत्या वापर करून रुग्णाच्या शरीरातील कर्करोगाच्या पेशी शोधून त्या नष्ट करण्यासाठी रोगप्रतिकारक पेशींना अधिक मजबुती द्यायची अशी ही इम्युनोथेरपी आहे. त्यांनी या थेरपीचे पेटंटही मिळवले असून टाटा रुग्णालयातील प्रा. गौरव नरुला यांच्या सहकार्याने या थेरपीची चाचणीही केली जाणार आहे. मानवी शरीरामध्ये ‘टी-सेल्स’ नावाच्या पेशी असतात. त्या पेशी कर्करोग व अन्य आजारांपासून शरीराचे संरक्षण करत असतात. कर्करोगाचे टय़ूमर्स ओळखून त्या नष्ट करण्याची ताकद या पेशींमध्ये असते. परंतु कर्करोग अधिक तीव्र झाला असेल म्हणजेच स्टेज 3 किंवा 4 पर्यंत पोहचला असेल तर त्या अवस्थेत कर्करोगाच्या पेशी रुग्णाच्या शरीरातील टी-सेल्सना निक्रिय करतात. ‘कारटी-सेल्स थेरपी’ने टी-सेल्समधील रोगप्रतिकारक क्षमता कायम ठेवून कर्करोगाच्या पेशींना मारले जाऊ शकते.

चिमरीक ऍण्टीजन रिसेप्टर्स (कार) हे टी-सेल्सना कर्करोगाच्या पेशींची क्षमता जाणून घेण्यास मदत करतात. त्यानंतर टी-सेल्स कर्करोगाच्या पेशींवर अचूक हल्ला करून त्यांना नष्ट करतात. रुग्णाच्या रक्तामधून टी-सेल्स वेगळे करून प्रक्रिया करून त्याचे ‘कार’ बनवले जातात. ते पुन्हा रुग्णाच्या रक्तवाहिनीमध्ये सोडले जातात.

परदेशांमध्येच या तंत्रज्ञानाचा खर्च कोट्यवधींमध्ये होता. खासगी कंपन्यांनी हिंदुस्थानातील रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान आयात केले पण एका रुग्णावर उपचाराचा खर्च सुमारे 35 लाख रुपये होतो. देशात हे तंत्रज्ञान आता विकसित झाल्याने एका वेळच्या उपचाराचा खर्च 15 लाखांपर्यंत येऊ शकतो असे प्रा. पुरवार यांनी सांगितले.

शास्त्रज्ञांच्या सहा वर्षांच्या मेहनतीला यश

प्रा. पुरवार आणि त्यांच्या टीमने ‘कारटी-सेल्स’ तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सहा वर्षे रात्रंदिवस मेहनत केली. त्यासाठी आवश्यक सुविधा आयआयटी मुंबईत निर्माण केल्या. कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिले. त्यासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूटचे सहकार्यही घेण्यात आले. प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या वाढवलेल्या कर्करोगाच्या पेशींवर या थेरपीची चाचणी करण्यात आली असून ही थेरपी सुरक्षित असल्याचा निष्कर्षही शास्त्रज्ञांनी काढला आहे. देशाच्या औषध नियंत्रक महासंचालकांची परवानगी मिळाल्यानंतर येत्या दोन वर्षांत ही थेरपी सर्वत्र उपलब्ध होईल असे प्रा. पुरवार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या