आसामला हिंदुस्थानपासून तोडण्याचे विखारी वक्तव्य, जेएनयूचा विद्यार्थी शरजीलविरोधात गुन्हा दाखल

4077

पूर्वोत्तर आणि आसामला हिंदुस्थानपासून तोडण्याचे विखारी वक्तव्य करणारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी शरजील इमाम याच्याविरोधात आसाम पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. शाहीन बागमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात बोलताना शरजीलने हिंदुस्थानचे तुकडे करण्याची भाषा केली होती. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने जोरदार हल्लाबोल केला. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केला असून हा शाहीन बागमध्ये तुकडे तुकडे गँगचा हिंदुस्थानचा तोडण्याचा कट शिजत असल्याचा आरोप केला. तसेच हे देशद्रोही नाही तर काय आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आसाम पोलिसांनी शरजील विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे, तसेच दिल्ली पोलिसांनी कलम 153 अन्वये गुन्हा दाखल केला आहे, तर उत्तर प्रदेशमधील अलीगड येथेही त्याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. शरजीलच्या अटकेसाठी दिल्ली पोलीस, उत्तर प्रदेश पोलीस आणि बिहार पोलीस एकत्र कामाला लागली आहे. यासाठी दोन पथक तयार करण्यात आली आहेत.

या प्रकरणी अलीगडचे एसएसपी आकाश कुलहरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, जेएनयूचा विद्यार्थी आणि दिल्लीतील शाहीनबागमध्ये सीएएविरोधात मोर्चाचा आयोजनकर्ता शरजील इमामच्या अटकेसाठी दोन पथकं रवाना करण्यात आली आहेत. दिल्ली आणि बिहार पोलिसांसोबत मिळून आम्ही काम करत असल्याचे ते म्हणाले.

काय आहे प्रकार?
दिल्लीतील शाहीनबागमध्ये सीएएविरोधात गेल्या एक महिन्यापासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमाम याने वादग्रस्त भाषण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पूर्वोत्तर आणि आसामला हिंदुस्थानपासून तोडण्याचे विधान तो या व्हिडीओत करताना दिसत आहे. 16 जानेवारीचा हा व्हिडीओ आहे.

आपली प्रतिक्रिया द्या