बीड जिल्हा हादरला…अंबाजोगाईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार!

राज्यात महिलांवरील अत्याचारांचे सत्र सुरू असताना बदलापूरच्या घटनेने संपूर्ण राज्याची मान शरमेने झुकली. या घटना ताज्या असतानाच अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्याने बीड जिल्हा हादरला आहे.

अंबाजोगाई तालुक्यात धानोरा (बु.) येथे सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोवीस वर्षीय नराधमावर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी नराधम श्रीकांत वसंत मुळे याने गावातीलच एका सतरावर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 ऑगस्ट रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास बलात्कार केला व ‘या घटनेची माहिती कोणाला देऊ नको, अन्यथा तुझ्या कुटुंबाला संपवून टाकेल!’ अशी धमकी आरोपीने दिल्यामुळे पीडितेने याची वाच्यता केली नाही.

अखेर आरोपीचे कुकर्म 23 ऑगस्ट रोजी उघडकीस आले. पीडिता व तिचे कुटुंबीय अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले. मात्र, हा गुन्हा दाखल होऊ नये, प्रकरण बाहेरच मिटले जावे म्हणून खूप प्रयत्न केले गेल्याचे समजते. मात्र त्याला यश आले नाही. अखेर जनरेट्यामुळे अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी श्रीकांत मुळे याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.