विवाहसोहळ्यातून कोरोनाचा फैलाव; 200 जणांवर गुन्हा दाखल

भूम तालुक्यातील राळेंसांगवी सध्या कोरोना हॉटस्पॉट बनत आहे. प्रशासनाची परवानगी न घेता 29 जून रोजी तेथे लग्न सोहळा झाला होता. या विवाह सोहळ्याला 200 पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती होती. या विवाह सोहळ्यातूनच कोरोनाचा फैलाव झाल्याचा प्रशासनाचा संशय आहे. राळेंसांगवीच्या ग्रामसेविका सुषमा स्वामी यांच्या तक्रारीवरून तब्बल 13 दिवसांनी भूम पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. विवाह सोहळ्याच्या आयोजकांसह लग्नात सहभागी असणाऱ्या 200 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भूम तालुक्यातील राळेसांगवी येथील दत्ता टाकळे यांनी त्यांच्या मुलीचा विवाह 29 जून रोजी केला. या लग्नाला 200 पेक्षा अधिक लोक उपस्थित होते. या लग्नात स्वतः दत्ता टाळके यांनी पाहुण्यांना स्वत:च्या इनोव्हा गाडीतून नेले होते. तसेच यादरम्यान त्यांनी राळेसांगवीसह शेजारील गावात भाजी- पाल्याची विक्रीही केली होती. लग्नानंतर चार दिवसांनी दत्ता टाळके यांना त्रास होत असल्याने भूम ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांचा अहवाल कोरोना पोझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांचा संपर्कातील 17 जण कोरोना पोझिटिव्ह आल्याने या लग्नात कोरोनाचा फैलाव झाल्याचा प्रशासनाचा संशय आहे.

या विवाहसोहळ्यातूनच कोरोनाचा फैलाव झाल्याचा संशय असल्याने दत्ता टाळके यांच्यासह लग्नात उपस्थित असलेल्या सर्वांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 5 ब, साथरोग प्रतिबंध कायदा कलम 2, 3, 4 व महाराष्ट्र कोविड19 कायदा कलम 11 प्रमाणे भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश गडवे करत आहेत. गावातील कोरोना कक्ष व तालुका कोरोना कक्ष अधिकाऱ्यांनी या विवाह सोहळ्याकडे दुर्लक्ष केल्याने तसेच त्यांना माहिती असताना गुन्हा दाखल न केल्याने संसर्ग वाढला असल्याचे बोलले जात आहे. कोणी परवानगीशिवाय आणि शासकीय नियमांना बगल देऊन असे कार्य करीत असल्याचे दिसून आल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे भूम येथील पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या