जमिनीच्या वादातून हाणामारी; नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल

864

न्यायालयात असलेल्या जमीनीच्या वादातून एका गटाने काहीजणांना बेदम मारहाण केली आहे. लातूरमध्ये घडलेल्या या प्रकरणी 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतीच्या जमीनीवरून वाद झाल्यानंतर तू आमच्या घरच्या शेतात कसा आलास, अशा विचारणा करत कुऱ्हाडीच्या दांड्याने, जनावराच्या लोढण्याने आणि काठीने हाणामारी झाली. या प्रकरणी नऊ जणांविरुध्द चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालाजी मारोती सुरनर (रा. विकास नगर, देगलूर रोड, उदगीर) यांनी चाकूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, खरबवाडी शिवारात तक्रारदारांचे सासरे रामचंद्र भिमराव देवकत्ते यांनी 1 हेक्टर 6 आर जमीन बैनामा करून दिली आहे. ही जमीन तक्रारदाराच्या सासऱ्याच्या ताब्यात आहे. 24 मे रोजी खरबवाडी येथे तक्रारदार साडुच्या मुलीला भेटण्यासाठी गेला असता सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराचे चुलत सासरे धोंडीबा भिमराव देवकत्ते, बापुराव भिमराव देवकत्ते यांनी तू येथे आमच्या शेतात कसा आलास म्हणून सुरकर यांना शिवीगाळ केली. त्र्यंबक धोंडीबा देवकत्ते, नरसिंग बापुराव देवकत्ते, राहूल त्र्यंबक देवकत्ते, किरण त्र्यंबक देवकत्ते, रोहन नरसिंग देवकत्ते, रोहित नरसिंग देवकत्ते हे तिथे आले व त्यांनी कुऱ्हाडीच्या दांड्याने, जनावराला बांधण्याच्या लोंढण्याने सुरकर यांना मारहाण केली. भांडण सोडवण्यास आलेले तक्रारदाराचे चुलत सासरे नाजुकराव भिमराव देवकत्ते, विश्वनाथ नाजुकराव देवकत्ते, काशिनाथ नाजुकराव देवकत्ते यांना तुम्ही भांडण सोडवण्यासाठी कसे आला म्हणून लाथाबुक्क्याने, काठीने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या