सीबीआय कोर्टाचा दिलासा नाहीच, आरोपी विक्रम भावेचा जामीन अर्ज फेटाळला

706

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी विक्रम भावे याला दिलासा देण्यास पुण्याच्या विशेष सीबीआय कोर्टाने आज नकार दिला. आरोपीविरोधात सबळ पुरावे असल्याने त्याची सुटका करता येणार नाही असे स्पष्ट करत न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी भावेचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

पुणे येथे 20 ऑगस्ट 2013 साली मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या वतीने करण्यात येत असून मुख्य आरोपी शरद कळसकर याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी सीबीआयच्या तपास अधिकाऱयांनी मे महिन्यात ऍड. संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहकारी विक्रम भावे याला अटक केली होती.

ऍड. संजीव पुनाळेकर यांनी दाभोलकर यांचा मारेकरी शरद कळसकर याला खाडीत पिस्तूल लपविण्याबाबत मार्गदर्शन केले होते तर भावे याने हत्येपूर्वी घटनास्थळाची रेकी केली होती असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात ऍड. पुनाळेकर यांना जामीन मिळाला तर विक्रम भावे याने जामिनासाठी विशेष सीबीआय कोर्टात अर्ज केला. मात्र न्यायालयाने आज त्याला दिलासा देण्यास नकार देत त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. सरकारी वकील म्हणून प्रकाश सूर्यवंशी यांनी काम पाहिले.

आपली प्रतिक्रिया द्या