लडाखमधील Gen-Z क्रांतीनंतर सोनम वांगचुक CBI च्या रडारवर; NGO तील परदेशी फंडिंग आणि कथित पाकिस्तान भेटीची चौकशी सुरू

लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसह अनेक मुद्द्यांवर आंदोलन करून सरकारला घेरणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोनम वांगचुक हे केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) च्या रडारवर आले आहेत. सीबीआयने वांगचुक यांच्या ‘हिमालयन इंस्टिट्यूट ऑफ अल्टरनेटीव्ह लर्निंग’ या एनजीओतील परदेशी फंडिंगची आणि त्यांनी याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कथित पाकिस्तान दौऱ्याचीही चौकशी सुरू केली आहे. ‘एएनआय’ने सीबीआय सूत्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.

परदेशी योगदान (नियमन) कायद्याच्या (एफसीआरए) कथित उल्लंघनासंदर्भात सीबीआयकडून प्राथमिक चौकशी सुरू आहे. दोन महिन्यांपासून ही चौकशी सुरू असून 10 दिवसांपूर्वी सीबीआयचे एक पथक याबाबत सरकारी आदेश घेऊन आल्याची माहिती वांगचुक यांनी पीटीआयला दिली. ‘हिमालयन इंस्टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव लर्निंग’ला देण्यात आलेली जमीन वाटप रद्द करण्यात आली असून ज्या कारणासाठी जमीन वाटप करण्यात आली होती, त्यासाठी तिचा वापर होत नसल्याचे समोर आले होते. तसेच या एनजीओतील परदेशी फंडिंगचीही चौकशी सुरू आहे. मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

लडाखचा समावेश सहाव्या अनुसुचित करावा आणि पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा यासाठी लेहमध्ये हिंसक आंदोलन झाले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला आग लावण्यात आली. पोलिसांवर दगडफेक झाली, एवढेच नाही तर सीआरपीएफचे वाहनही पेटवून देण्यात आले.

लडाख पेटलं! रोजगार आणि लोकशाहीसाठी जेन झी क्रांती, भाजपचं कार्यालय जाळलं; सीआरपीएफचे वाहन पेटवले!!

लेहमध्ये झालेल्या या हिंसक आंदोलनासाठी केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांना जबाबदार धरले आहे. तसेच सीबीआयकडून त्यांच्या एनजीओतील परदेशी फंडिंगची आणि फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कथित पाकिस्तानी दौऱ्याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे वांगचुक यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.