सीसीटीव्हींमुळे गुन्ह्यांची संख्या घटण्यास मदत – पुणे पोलीस आयुक्त

शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हींचे जाळे वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे गुन्ह्यांची संख्या घटण्यास मदत झाली आहे. गृहविभागाकडून शहरातील विविध भागात आतापर्यंत 1 हजारांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. अजूनही 1 हजार 400 सीसीटीव्ही प्रास्तावित आहेत. सीसीटींव्हीच्या जाळ्यामुळे गुन्ह्यांची उकल होण्यासही मदत होत असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

महानगरपालिका आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 150 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. त्यासंदर्भात नियंत्रण कक्षाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, आमदार सुनील कांबळे, भाजप सभागृह नेते गणेश बीडकर, एसीपी सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम उपस्थित होते.

गुप्ता म्हणाले, सीसीटीव्हींमुळे आरोपींचा माग काढण्यास मदत होते. त्यामुळे अल्पावधीत गुन्ह्यांची उकल होते. दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध प्रकल्प हाती घेताना निधीची अडचण निर्माण होते. मात्र, यासंदर्भात महापालिकेने निधी उपलब्ध करून दिल्यास प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे. त्याशिवाय इ- व्हेईकल संदर्भात पोलिसांनी महानगरपालिकेकडे प्रस्ताव दिला आहे. संबंधित प्रकल्पही कार्यन्वित होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, महापालिकेकडून पुणे पोलिसांना आवश्यक ती मदत केली जाणार आहे. त्यामुळे विविध प्रकल्प मार्गी लावण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान, नागरिकांसह स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. त्यानुसार तत्काळ विकास निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सभागृह नेते गणेश बीडकर यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी केले.

सीसीटीव्हीमुळे 24 चौकात राहणार नजर

समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हींमुळे 24 चौकात पोलिसांची नजर असणार आहे. त्याशिवाय 11 किलोमीटर परिसरातील सीसीटींव्हीचे नियंत्रण थेट आयुक्तालयात आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेसह पालखी सोहळा, गणेशोत्सवात फायदा होणार आहे. विशेषतः रूग्णालये, बसस्थानके, गणेश मंडळ, एटीएम सेंटरसह गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या