सततच्या धमक्यांमुळे केंद्राने आज उड्डाणांवर एअर मार्शलची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. ते विमानात साध्या कपडय़ातच राहतील. याशिवाय गृह मंत्रालयाने विमान वाहतूक मंत्रालयाकडून अहवाल मागवला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणामध्ये 6 एफआयआर नोंदवले असून मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमधील एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. त्याला ज्युवेनाईल बोर्डाकडे पाठवण्यात आले आहे. धमकी देणाऱ्या सोशल मीडिया अकाऊंटचा मागोवा घेतला जात आहे. दरम्यान, आजही तब्बल सात विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्याने त्यांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
बॉम्बच्या धमक्या मिळालेल्या विमानांमध्ये इंडिगोच्या चार, स्पाइसजेटच्या 2 आणि अकासाच्या एका विमानाचा समावेश आहे. गेल्या 3 दिवसांत 19 विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. 15 ऑक्टोबर रोजी 7 विमानांना बॉम्बच्या धमक्या आल्या. दिल्ली ते शिकागो या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचाही उड्डाणांमध्ये समावेश होता. त्याला कॅनडाला वळवण्यात आले आणि इक्लुईट विमानतळावर उतरवण्यात आले. विमान वाहतूक मंत्रालयाने आज विमान पंपन्यांना धमकीचे संदेश पाठवण्याबाबत संसदीय समितीला उत्तर दिले. आरोपींची ओळख पटली असून कारवाई सुरू असल्याचे मंत्रालयाने सांगितले. तसेच अधिक माहिती मागवून अशा अनेक प्रकरणांवर कारवाई करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.
z इंडिगोचे मुंबई-दिल्ली विमान सुरक्षा सतर्कतेमुळे अहमदाबादला पाठवण्यात आले. येथे सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप उतरवण्यात आले.
z अकासा एअर फ्लाईट क्यूपी 1335ने दिल्लीहून बंगळुरूला उड्डाण केले. उड्डाणानंतर लगेच बॉम्बची धमकी मिळाली. विमानात 177 प्रवाशी आणि 7 केबिन क्रू होते. धमकी दिल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास विमान पुन्हा दिल्लीला आणून इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले.
z 15 ऑक्टोबरला एअर इंडियाच्या दिल्ली ते शिकागो या विमानालाही बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यानंतर हे विमान कॅनडाला उतरवण्यात आले. या दिवशीही दिवसभरात तब्बल 7 उड्डाणे धोक्यात आल्याने सुरक्षा यंत्रणांनी अनेक विमानतळांवर दहशतवादी कवायती केल्या.