लॉकडाऊनचे शंभर दिवस; मध्य रेल्वे 387 तर पश्चिम रेल्वे 378 कोटींचा रिफंड प्रवाशांना देणार!

541
railway-tracks-mumbai-local

कोरोना साथीच्या अटकावासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनला कालच तब्बल 100 दिवस पूर्ण झाले असून या शंभर दिवसांत जग संपूर्ण बदलून गेले आहे. 23 मार्चपासून रेल्वेने लॉकडाऊन घोषीत करीत प्रवासी सेवेसह सर्व रेल्वे गाडय़ांची वाहतूक बंद केली होती. या 100 दिवसांत मध्य रेल्वे 54 लाख प्रवाशांनी तिकिटे रद्द झाल्याने ‘रिफंड’ म्हणून 387 कोटी तर पश्चिम रेल्वे 378 कोटी रूपयांची रक्कम प्रवाशांना परत करणार आहे.

‘कोविड-19’ चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभर टाळेबंदी जाहीर रेल्वेसह सर्व प्रकारच्या वाहतूकीवर निर्बंध आले. रेल्वेने दरम्यानच्या काळात आपली मालवाहतूक आणि पार्सल सेवा चालू ठेवत जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक केली. त्यानंतर जागोजागी अडकलेल्या मजूरांच्या वाहतूकसाठी रेल्वेने सर्वप्रथम 1 मे पासून ‘श्रमिक स्पेशल ट्रेनची सुरूवात केली. त्यानंतर 12 मेपासून 51 दिवसांच्या टाळेबंदी नंतर रेल्वेने राजधानीच्या मार्गावर 15 वातानुकूलित स्पेशल ट्रेनची सुरुवात केली. त्यानंतर रेल्वेने 1 जूनपासून वेळापत्रकावर आधारित 200 ट्रेनची सुरूवात केली. या शंभर दिवसांत मध्य रेल्वेच्या 54 लाख प्रवाशांनी तिकीट रद्द केल्याने त्यांना 387 कोटी रूपयांची रक्कम रिफंड म्हणून परत करणार आहे. तर पश्चिम रेल्वेच्या 58 लाख प्रवाशांनी तिकीटे रद्द केल्याने 378 कोटींचा परतावा देणार आहे. यात एकटय़ा मुंबई डिव्हीजनचा परतावा 179 कोटी रुपये इतका आहे.

पश्चिम रेल्वेची साडेअठरा लाखांची मजूर वापसी
पश्चिम रेल्वेने या काळात एकूण 1230 श्रमिक स्पेशल ट्रेन चालवित 18.50 लाख मजूरांना त्यांच्या मूळ राज्यात पाठविले आहे. तर मध्य रेल्वेने सुमारे 607 श्रमिक स्पेशल ट्रेनद्वारे साडे आठ लाख मजूरांची त्यांच्या मूळगावी रवानगी केली आहे. या 100 दिवसाच्या काळात मध्य रेल्वेने 5,306 मालगाडय़ांद्वारे 13.39 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे. तर पश्चिम रेल्वेने 372 विशेष पार्सल ट्रेनमार्फत 78 हजार टन अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक केली आहे.

पश्चिम रेल्वेचे 1541 कोटींचे नुकसान
कोरोना व्हायरसमुळे पश्चिम रेल्वेच्या कमाईतील एकूण 1541 कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ज्यात उपनगरीय सेवांमध्ये 223.63 कोटींचा तर लांबपल्ल्याच्या गाडय़ा न धावल्याने 1317 कोटींचा फटका बसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या