महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. निवडणूक यंत्रणेची तयारीही अंतिम टप्प्यात पोहचली आहे. उद्या मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा दिल्लीकडे लागल्या आहेत.
जम्मू-कश्मीर आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या वरचेवर सुरू असलेल्या बैठका आणि मतदारांना आकर्षित करणाऱ्या निर्णयांचा सरकारचा धडाका पाहता कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची सुरू असलेली धावळ लक्षात घेता मंगळवारी निवडणुकीच्या तारखांची घोषणा होईल अशी चर्चा आहे. निवडणुकांची घोषणा होताच त्या क्षणापासून राज्यात आचारसंहिता लागू होईल.
राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर
राजकीय पक्षांकडून जागावाटप, उमेदवार निश्चिती यासाठी बैठका सुरू आहेत. निवडणुकीच्या घोषणेची वेळ जसजशी जवळ येत आहे तशा राजकीय पक्षांच्या बैठकांचा जोर वाढला आहे. काँग्रेसच्या निवडणुकीच्या रणनीतीसाठी राज्यातील नेते दिल्लीत पोहोचले आहेत. भाजपच्या नेत्यांच्याही दिल्लीत जोरबैठका सुरू आहेत.