मेट्रोची माती कफ परेडच्या समुद्रात

metro-file-photo

सामना प्रतिनिधी । मुंबई

कफ परेड येथील बॅकबे रिक्लेमेशनजवळ सुमारे ३०० एकर क्षेत्रफळावर समुद्रालगत भराव टाकून भव्य उद्यान (सेंट्रल पार्क) पालिकेतर्फे उभारण्यात येणार आहे. संपूर्ण मुंबईभर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामातून बाहेर आलेली माती भराव टाकण्यासाठी वापरली जाणार आहे. या पार्कसाठी एमएमआरडीएने नुकतीच पालिकेला परवानगी दिली आहे.

कफ परेड येथे समुद्रात भराव टाकून भव्य उद्यान साकारण्यात येणार असून त्यामुळे मुंबईकरांना आणि पर्यटकांना भविष्यात विरंगुळय़ासाठी नवीन ठिकाण मिळू शकणार आहे. पालिकेचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या या सेंट्रल पार्कसाठी समुद्रालगत भराव टाकण्यात येणार आहे. भराव टाकण्यासाठी मुंबई मेट्रोकरिता खोदण्यात येणाऱया भुयारांमधून तसेच इतर प्रकल्पांमधून निघणारी माती वा मुरुम वापरण्यात येणार आहे. हा भूभाग एमएमआरडीएच्या अखत्यारित असून या प्राधिकरणाने पालिकेला नुकतेच ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे. ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था’ व ‘राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था’ या दोन्ही संस्थांनी तयार केलेल्या मूल्यमापन अहवालाचा अभ्यास केला आहे. त्यावर आधारित अंमलबजावणी अहवाल व विविध अहवाल तयार करण्यासह निविदेचा मसुदा तयार करण्यासाठी सल्लागाराची निवड प्रशासनाने केली आहे. ‘मे. टाटा कन्सल्टिंग इंजिनीयर्स लि.’ यांना सल्लागार नेमण्याबाबतचा प्रस्वात येत्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी येणार आहे.

सेंट्रल पार्कमध्ये काय?
या उद्यानामध्ये १८.२९ मीटर रुंदीचा डीपी रोड बांधण्यात येणार आहे. तसेच जेट्टी, वॉटर वे बांधण्यात येणार आहे. या कामासाठी लागणाऱया विविध परवानग्या, परवाने मिळविण्यासाठी मदत करणे, प्रकल्पाच्या विकासासाठी विविध पर्याय सुचविणे आणि आराखडे तयार करण्यासह त्रिमितीय (थ्रीडी) दृष्य चित्रफीत तयार करणे इत्यादी बाबी सल्लागारांना कराव्या लागणार आहे. या जागी उद्यान झाल्यास होणारी अभ्यागतांची वर्दळ, त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर करावयाचे वाहतूक व्यवस्थापन, पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी बाबींचा अभ्यास करून तसेच सुरक्षाविषयक बाबींचा अभ्यास करून नावीन्यपूर्ण उपक्रमांचा अंतर्भाव विस्तृत प्रकल्प अहवालात करणे अपेक्षित आहे. या कामाकरिता पालिका सल्लागाराला ३.८७ कोटी रुपये देणार आहेत.