मध्य रेल्वेवर आता दररोज धावणार 423 लोकल फेऱ्या

उपनगरीय लोकलसेवा सध्या केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येत आहेत. पश्चिम रेल्वेने अलिकडेच आपल्या दररोजच्या फेऱ्या 350 वरून 500 केल्यानंतर आता मध्य रेल्वेनेही 24 सप्टेंबरपासून 423 लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या पिकअवरमध्ये अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वे कोरोनाकाळात दररोज 355 विशेष फेऱ्या चालवित होती. ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने गुरूवारपासून 68 अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या रोजच्या उपनगरीय फेऱ्यांची संख्या आता 423 इतकी झाली आहे. र

– मुख्य मार्गावर 46 फेऱ्याआणि हार्बरवर 22 फेऱ्या
या 68 लोकलपैकी 46 लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, खोपोली, कर्जत दरम्यान चालवण्यात येत आहेत तर अन्य 22 लोकल हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि गोरेगाव या दरम्यान चालवण्यात येतील, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या विनंतीवरून मध्य रेल्वेने 15 जूनपासून मुंबई उपनगरी मार्गांवर अत्यावश्यक प्रवाशांसाठी विशेष लोकल गाड्यांची वाहतूक सुरू केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गर्दी टाळण्यासाठी आणि सोशल डीस्टन्स राखण्यासाठी फेऱ्यांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या