वणव्याने रोखली मध्य रेल्वे; खर्डी ते कसारा पाऊण तास वाहतूक ठप्प

मध्य रेल्वेची वाहतूक कशामुळे रोखली जाईल याचा भरोसा नाही.  बुधवारी रात्री खर्डी ते उंबरमाळी दरम्यान रेल्वे मार्गालगत असलेल्या गवताला अचानक आग लागली आणि ही आग पसरत जाऊन त्याचा वणवा भडकला. त्यामुळे रेल्वेची वाहतूक पाऊण तास ठप्प झाली.

खर्डी ते उंबरमाळी दरम्यान रेल्वे लाइनजवळ मोठय़ा प्रमाणावर गवत वाढले असून रात्री साडेआठच्या सुमारास अचानक या गवताने पेट घेतला. आगीचे वृत्त समजताच स्थानिक ग्रामस्थ, आपत्ती व्यवस्थापन टीम, पोलीस तसेच वन विभागाच्या कर्मचाऱयांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. पावणेनऊ ते सवानऊपर्यंत वाहतूक बंद होती.

अप मार्गावरील दोन व डाऊन मार्गावरील एक मेल एक्सप्रेस प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बंद ठेवली तर डाऊन मार्गावरील दोन लोकल व दोन मेल एक्सप्रेस गाडय़ा रोखून धरल्या. आग पूर्णपणे विझल्यानंतर रात्री उशिरा मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत झाली.

आपली प्रतिक्रिया द्या