जीएसटी कपातीनंतर वस्तूंच्या किमती कमी न केल्यास दुकानदारांवर कारवाई, जीएसटी विभागाचे अधिकारी धाडी टाकणार

केंद्र सरकारने 22 सप्टेंबरपासून जीएसटी दरांमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, किमती कमी झाल्या आहेत की नाही हे तपासण्यासाठी केंद्र आणि राज्य जीएसटी विभागातील क्षेत्रीय अधिकारी बाजारपेठेत अचानक तपासणी करणार आहेत.

ज्या वस्तूंच्या किमती कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहेत, त्यानुसार किमती कमी केल्या नसल्याचे आढळले तर दुकानदारांना उपलब्ध असलेले कर क्रेडिट रोखले जाऊ शकते. म्हणजेच व्यापाऱयाला त्यांच्या विक्रीवर लावल्या जाणाऱया कराच्या तुलनेत खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवांवर भरलेला जीएसटी ऑफसेट करता येणार नाही.

रेल नीर झाले स्वस्त

भारतीय रेल्वेने दिवसा प्रवास करणाऱया लाखो प्रवाशांना दिलासा दिला असून प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये मिळणाऱया रेल नीरच्या किमतीत एक रुपयाची घट केली आहे. त्यानुसार एक लिटर रेल नीरची बॉटल आता 15 ऐवजी 14 रुपयांना तर अर्धा लिटरची बॉटल 10 रुपयांऐवजी 9 रुपयांना मिळणार आहे. नवीन दरवाढ सोमवारपासून लागू होणार आहे.

केंद्रीय जीएसटी विभागाने पाठवलेल्या सूचनेनुसार, कमी किमतीसाठी 54 वस्तूंची यादी तयार करण्यात आली आहे. यादीमध्ये सुका मेवा, स्टेशनरी, पुस्तके व सर्व प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे. अधिकाऱयांना बाजारात जाऊन सर्व वस्तूंच्या सध्याच्या किमती जाणून घेण्यास सांगण्यात आले आहे. जिथे किमती कमी केल्याचे आढळले नाही, तिथे विभाग त्या दुकानदारांवर योग्य कारवाई करेल.