पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सीसीएस अर्थात कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने दोन स्वदेशी आण्विक पाणबुड्या बनवण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी 40 हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली असून यामुळे नौदलाची ताकद वाढणार आहे. या दोन्ही पाणबुड्या हिंद महासागर आणि दक्षिण चीन महासागरात तैनात केल्या जातील. यामुळे एकाचवेळी चीन आणि पाकिस्तानवर वचक ठेवण्यास मदत होईल.
दोन्ही आण्विक पाणबुड्या विशाखापट्टणम येथील शिप बिल्डिंग सेंटरमध्ये बनवल्या जाणार आहेत. या पाणबुड्या 95 टक्के स्वदेशी असणार आहेत. अरिहंत श्रेणीतील या पाणबुड्या असणार असून यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
सध्या दोन पाणबुड्या बनवण्यात येणार असून आगामी काळात आणखी चार बनवण्यात येतील. हिंदुस्थानने नुकतीच एसएसबीएन अर्थात आयएनएस अरिहंत ही पाणबुडी लॉन्च केली होती. पुढील वर्षभरात नौदलाच्या ताफ्यात आणखी काही युद्धनौका आणि पाणबुड्यांचा समावेश होईल.