बाईकचे हप्ते फेडण्यासाठी चोरी करणारा अटकेत, तीन लाख 30 हजारांचा ऐवज जप्त

लॉकडाउनमुळे काम मिळत नसल्यामुळे दोन दुचाकींचे हप्ते फेडण्यासाठी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळींची चोरी करणाऱ्य़ाला पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून दोन गुन्हे उघडकीस आणून दागिन्यांसह  3 लाख 30 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

संजय भगत असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पाषाणमधील साई चौकातून एका महिलेचे सोन्याचे गंठण हिसकावून नेणाऱ्य़ा चोरट्याची माहिती पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन काढली.

त्यानुसार दुचाकीचा क्रमांक मिळवून आरटीओ कार्यालयातून माहिती मिळविली. पोलिसांनी संजयचा पत्ता शोधून त्याला उत्तमनगरमधून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दुचाकींचे हप्ते भरण्यासाठी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळींची चोरी केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमारे, मोहन जाधव, महेश भोसले, प्रकाश आव्हाड, वसीम सिद्धीकी, सारस साळवी, ज्ञानेश्वर मुळे, तेजस चोपडे, मुकुंद तारू, दीनेश गडांकुश, शैलेश सुर्वे, आशिष निमसे यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या