गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधात निवडून आलेल्या चारपैकी तीन संचालकांसह पराभूत झालेल्या सर्वच माजी संचालकांना ‘गोकुळ’च्या कारभाराबाबत कसलीही तक्रार नाही. पण सर्वसाधारण सभा आली की संचालिका शौमिका महाडिक या नाहक आरोप करत सुटतात. वर्षभरातील संचालक मंडळाच्या 70 टक्के बैठकांना त्या उपस्थित नाहीत; नंतर स्वाक्षरी करून त्या हजेरी लावतात. त्यामुळे त्यांनी प्रथम बैठकीस हजर राहून कामकाज समजून घ्यावे. तिथेच आपल्या प्रश्नांची उत्तरे घ्यावीत. तसे न करता, आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा स्टंट म्हणून त्या ‘गोकुळ’वर चुकीचे आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत, असा टोला ‘गोकुळ’चे चेअरमन अरुण डोंगळे यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
अरुण डोंगळे म्हणाले, ‘गोकुळ’चे 3600 सभासदांवरून मागील निवडणुकीत 4193 सभासद झाले. सध्या शासनाच्या परवानगीने आणि नियमानुसार 5 हजार 471 सभासद संस्था आहेत. यातील चारशे संस्था विरोधक महाडिकांच्या सत्ताकाळात प्रलंबित ठेवलेल्या आहेत. लहानातील लहानही संस्थेतील दूध यावे, 45 टक्के भूमिहीन दूध उत्पादकाला लाभ व्हावा, हाच ‘गोकुळ’चा उद्देश आहे. खासगीकरणासाठी सभासद वाढले, असे महाडिक म्हणतात, तर त्यांच्या सत्ताकाळात सभासदांचे हित डावलणारा मल्टिस्टेटचा निर्णय त्यांच्या पाहुण्यांच्या फायद्यासाठी घेतला होता का, असा सवाल करत, शौमिका महाडिक यांनी आज होणाऱया सर्वसाधारण सभेत संचालकांप्रमाणेच यावे. ही सभा सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी असते. या बैठकांना त्या कधीही येत नाहीत. आल्या तर उशिरा येऊन रजिस्टरवर सही करून जातात. त्यांना त्यांच्या प्रॉम्टरने काही माहिती पुरवली असेल तरच त्या बोलतात, असा टोलाही डोंगळे यांनी लगावला.
‘गोकुळ’तर्फे पशुवैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे. शासकीय अधिकाऱयांसोबत मुंबईत 26 ऑगस्टची बैठक शौमिका महाडिक यांच्यासाठी 27 ऑगस्टला घेण्याचे ठरवले, तरीही त्या अनुपस्थित राहिल्या. या महाविद्यालयासाठी शासनाच्या अटी जाचक असल्याने आतापर्यंत 32 प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत. ‘गोकुळ’कडे यासाठी लागणारी 35 एकर जमीन नाही. ती शासनाने भाडेपट्टीवर द्यावी, अशी ‘गोकुळ’ची मागणी आहे. महासभेत ह प्रस्ताव मंजुरीनंतरच शासनाकडे पाठवला जाणार आहे. महाडिक प्रसिद्धीसाठी ‘गोकुळ’च्या व्यवस्थापनावर आरोप करत आहेत. शौमिका महाडिक यांनी संचालक मंडळाच्या कामकाजात सहभागी होऊन अभ्यास करून बोलावे. प्रसिद्धीसाठी टीका करणे बंद करावे, असेही अरुण डोंगळे यांनी सुनावले.
… तर आजची सभा रद्द करू
z अरुण डोंगळे म्हणाले, शौमिका महाडिक या काही शब्द मराठीत आणि इंग्रजीत बोलून आपण सर्वज्ञानी असल्याचे भासवतात. मात्र, आम्ही सर्व संचालक उच्चशिक्षित आहोत, याचे भान त्यांनी ठेवावे. शौमिका महाडिक या अहवाल मिळू दिला नसल्याचे खोटे सांगत आहेत, त्यामुळे एकही दूध उत्पादक संस्थेला अहवाल मिळाला नसल्याचे कोणी पुराव्यासह सांगितल्यास उद्या (दि. 30) होणारी सर्वसाधारण सभा रद्द करू, असा इशाराही अरुण डोंगळे यांनी दिला.