‘जागतिक कविता दिना’निमित्त नाशिकमध्ये रंगला काव्यजागर; चैताली कापसे यांच्या ‘बाबा माझं काळीज’ कवितेस ‘काव्य करंडक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
world-poetry-day-celebrated-in-nashik-with-kavya-jagar-poetry-marathon

‘जागतिक कविता दिना’चे औचित्य साधून ‘नाशिक कवी’ संस्थेच्या वतीने यावर्षीपासून एका अनोख्या ‘काव्यजागर’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजेपासून सुरू झालेल्या या अखंड काव्यप्रवासात विविध भागांतून आलेल्या कवींनी आपल्या रचना सादर केल्या. या चुरशीच्या स्पर्धेत चैताली कापसे यांच्या ‘बाबा माझं काळीज’ या हृदयस्पर्शी कवितेने बाजी मारत प्रथम क्रमांकाचा ‘काव्य करंडक’ पटकावला.

दिवसभर रंगला काव्याचा जागर

या उपक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध करण्यात आले होते. दर तासाला वीस कवितांचे सादरीकरण झाले. प्रत्येक तासाला सादर झालेल्या कवितांमधून दोन उत्कृष्ट कवींची निवड करून, अंतिम फेरीसाठी एकूण १६ कविता निवडण्यात आल्या. समारोपाच्या सत्रात या १६ कवितांचे पुन्हा सादरीकरण झाले.

प्रा. सुनील हिंगणे आणि प्रा. प्रतिभा औटी यांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले. निकाल जाहीर करताना परीक्षक म्हणाले की, “अंतिम फेरीतील सर्वच कविता उत्कृष्ट होत्या, त्यामुळे एका कवितेची निवड करताना आमची मोठी कसरत झाली. मात्र, करंडक एकाच रचनेला द्यायचा असल्याने आम्ही एकमताने ‘बाबा माझं काळीज’ या कवितेची निवड केली.”

नियोजनाची व्यापकता आणि मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्याची सुरुवात ‘महाराष्ट्र गीताने’ दिमाखात झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक तासाच्या सत्रासाठी एक अध्यक्ष, दोन परीक्षक आणि एक सूत्रसंचालक असे नियोजन होते. यामध्ये प्र.द. कुलकर्णी, नरेश महाजन, अरुण सोनवणे, प्रशांत भरवीरकर, पियुष नाशिककर, राजेंद्र उगले, राज शेळके, राखी जोशी, मनोहर विभांडिक, रामचंद्र कुलकर्णी, आरती डिंगोरे, प्रवीण जोंधळे, जयश्री वाघ, सोमनाथ साखरे, प्रशांत केंदळे आणि गोरख पालवे या कवींनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

व्यासपीठावर ‘नाशिक कवी’चे अध्यक्ष इंजि. बाळासाहेब मगर, कार्याध्यक्ष सुभाष सबनीस, कार्यवाह नंदकिशोर ठोंबरे, उपाध्यक्ष बाळासाहेब गिरी, स्मिता बनकर, भारती देव आणि किरण मेतकर उपस्थित होते. या सोहळ्यासाठी नाशिकसह औरंगाबाद, सिल्वासा, सटाणा, नांदगाव, लासलगाव आणि कळवण येथून कवी मोठ्या संख्येने आले होते.

विजेत्या चैताली कापसे यांच्या भावना

पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना चैताली कापसे-मोडक म्हणाल्या, “गेले दोन दिवस मी शुभेच्छांच्या वर्षावामुळे सेलिब्रिटी असल्यासारखा अनुभव घेत आहे. अनेकांनी फोन करून ‘करंडक योग्य हातात गेला’ अशा शब्दांत माझे कौतुक केले, याचे मला मोठे समाधान आहे. ‘बाबा माझं काळीज’ ही केवळ रचना नसून वडील आणि मुलीच्या नात्यातील वास्तव भावना आहेत. माझ्या या रचनेचा सन्मान केल्याबद्दल मी नाशिक कवीच्या आयोजकांचे आभार मानते.”